अलीकडे जगात इसिसची भुते डोके वर काढत असताना दहशतवाद्यांचा नि:पात जरूर झाला पाहिजे. परंतु त्यासाठी बॉम्बहल्ले करून दहशतवाद संपविता येणार नाही, असे मत ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
रविवारी सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आले असता सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात अॅड. निकम यांनी दहशतवादासह अन्य मुद्यांवर मते मांडली.
फ्रान्समध्ये अलीकडे इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा २६/११च्या मुंबई हल्ल्याची पुढची सुधारित आवृत्तीच होती. त्यानंतर दहशतवाद संपविण्यासाठी फ्रान्सने चालविलेल्या बॉम्बहल्ल्यांच्या संदर्भात भाष्य करताना अॅड. निकम यांनी बॉम्बवर्षांव करून दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही, तर उलट त्यातून निष्पाप माणसे मारली जातात. हे वास्तव विचारात घेऊन दहशतवादाच्या विरोधात नेमकेपणाने लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
देशात सार्वजनिक स्वरूपात धर्माधानुकरण वाढत चालले असून, यात कोणा एका विशिष्ट धर्मीयांचा सहभाग नाही. तर दोन्ही बाजूंनी असे प्रकार वाढत आहेत. त्यातून असहिष्णुता वाढताना दुसऱ्या बाजूला सामाजिक ध्रुवीकरण वाढत जाणे, ही बाब दहशतवादासाठी पोषक ठरू शकते. ही वाढती धर्माधता दूर होण्यासाठी प्रसारमाध्यमेच महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात, असेही मत त्यांनी मांडले.
दहशतवादाशी लढा देताना प्रसारमाध्यमांची भूमिका नेहमीच सकारात्मक असली पाहिजे, असे सांगताना अॅड. निकम म्हणाले, दहशतवाद्यांचा मूळ उद्देश समाजात दहशत निर्माण करून आपली मते लादणे, मागण्या मान्य करून घेणे, असा असतो. दहशतवाद्यांची कृत्ये प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली तर त्यातून दहशतवादाला आणखी खतपाणी घातल्यासारखे ठरेल. त्यावर प्रसारमाध्यमांनी टीआरपीचा विचार न करता सकारात्मकता दाखवण्याची गरज आहे. या वेळी निकम यांनी २६/११च्या मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि फ्रान्समधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ला, या दोन्ही घटनांच्या वेळी भारतीय प्रसारमाध्यमांनी आणि फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांनी निभावलेल्या भूमिकेची परस्पर तुलना केली. त्यांनी फ्रान्समधील प्रसारमाध्यमांचे कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा