मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्काराच्या प्रकरणात केलेल्या सुनावणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नागपूर खंडपीठाने १३ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करताना खंडपीठाने आरोपीच्या कृत्याला बलात्कार म्हटलेलं नाही. न्यायमूर्ती म्हणाल्या, “हा बलात्कार किंवा वासना नव्हती, तर केवळ प्रेमसंबंध होते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून निर्माण झाले होते.” आरोपीला जामीन देताना न्यायमूर्तींनी केलेल्या या टिप्पणीवरून वाद सुरू झाला आहे. या जामीनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना म्हटलं आहे की, मुलीने तिच्या जबानीत सांगितलं आहे की, “तिने तिच्या इच्छेने घर सोडलं होतं. त्यानंतर ती आरोपीबरोबर एकत्र राहिली.” या आरोपीचं वय २६ वर्षे आहे. दोघांनी त्यांचे प्रेमसंबध न्यायालयासमोर मान्य केले आहेत. दोघांमधील प्रेमातूनच शारिरिक संबंध निर्माण झाले. केवळ प्रेम आणि आकर्षणातून ते झालं आहे. आरोपीने पीडितेवर अत्याचार केले नाहीत, असं मुलीने न्यायालयासमोर सांगितलं आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांची १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलीचा शोध घेत असताना ती एका २६ वर्षीय तरुणाबरोबर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तरुणाच्या घरी पोहोचले. परंतु, मुलीने पोलिसांना सांगितलं की ती या तरुणावर प्रेम करते आणि तिला त्याच्याबरोबरच राहायचं आहे. ती तिच्या इच्छेने तरुणाच्या घरी आली आहे. परंतु, मुलीचं वय केवळ १३ वर्षे इतकंच असल्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली आणि मुलीला तिच्या कुटुंबाकडे सोपवलं.
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या तरुणाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच तरुणाविरोधात पॉस्कोअंतर्गत कलम ३४, कलम ६, ४ आणि १७ अन्यवे इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२० रोजी या तरुणाला अटक केली होती. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. २६ ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> “आम्हाला धमकावण्याचा परवाना…”, चीनवरून परतल्यावर मालदीवच्या अध्यक्षांनी भारताकडे डोळे वटारले
मुलीने न्यायालयाला काय सांगितलं?
मुलीने तिच्या जबानीत म्हटलं आहे की, ती आणि आरोपी एकमेकांवर प्रेम करतात. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणाने तिला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले नाहीत. दोघांमध्ये जे काही घडलं ते तिच्या मर्जीने घडलं. तर न्यायालयाने याप्रकरणी म्हटलं आहे की, या खटल्यात आतापर्यंत कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही. तसेच १३ वर्षीय मुलीच्या अशा संबंधांना असणाऱ्या सहमतीने काहीच फरक पडत नाही. परंतु, तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या मुलीच्या जबानीत तिने आधीच स्पष्ट केलं आहे की ती स्वतःहून तरुणाच्या घरी गेली होती. त्यामुळे न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की, कथित घटना ही हल्ला अथवा अत्याचार नाहीत. ती घटना म्हणजे दोघांमधील सहमतीने निर्माण झालेले संबंध आहेत. तसेच अटकेनंतर आरोपी तीन वर्षे तुरुंगात आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर करताना त्याने भोगलेल्या शिक्षेचाही विचार केला आहे.