सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांच्या अधिवासाबरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याने या ठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’ने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील आचरा किंवा मिठमुंबरी या भागात संवर्धन, प्रजनन केंद्र उभारण्याचे ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे.
समुद्री घोड्यांच्या संख्येला आणि अधिवासाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘बीएनएचएस’ने सिंधुदुर्गमध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन प्रकल्प तयार करण्याचे ठरविले आहे. हा प्रकल्प सात कोटी रुपयांचा असून, या माध्यमातून समुद्री घोड्यांचे प्रजनन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आचरा किंवा मिठमुंबरी भागात संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याचे ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे.