महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ‘ग्रंथोत्सव २०१४’ हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्य़ांच्या ठिकाणी आयोजित केला जातो. स्थानिक ठिकाणी असलेल्या साहित्याला व्यासपीठ मिळावे व वाचनसंस्कृती रुजावी यासाठी ग्रंथोत्सव हा उपक्रम जिल्ह्य़ात घेतला जातो. मराठी भाषा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १८, १९ व २० जानेवारी २०१४ रोजी ‘ग्रंथोत्सव २०१४’ चे आयोजन सावंतवाडी येथील श्री पंचमखेमराज महाविद्यालय येथील जिमखाना हॉल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली. मराठी भाषा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव २०१४ चे १८, १९ व २० जानेवारी २०१४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, उपाध्यक्ष अशोक करंबळेकर, श्री पंचमखेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, तहसीलदार वीरसिंग वसावे, उपप्राचार्य प्रा. जी. ए. बुवा, प्रवीण बांदेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोंडकर, विघ्नेश बुकडेपोचे विघ्नेश गोखले, वैजयंती प्रकाशनचे चंद्रहास उकिडवे, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, ग्रंथोत्सवच्या पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम हा १८ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, मा. आमदार दीपक केसरकर, श्रीमंत राजमाता सत्वशीलादेवी भोसले, मा. नगराध्यक्ष सावंतवाडी बबन साळगावकर, मी स्वत:, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक (भा. पो. से.) अभिषेक त्रिमुखे, ज्येष्ठ साहित्यिक हरिहर आठवलेकर, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर वर्षां शेडगे हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मा. श्री. जयानंद मठकर, तुकाराम नाईक, ल.मो. बांदेकर, आ. द. राणे हे आहेत. दिनांक १८ जानेवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत कविसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी अजय कांडर हे असणार आहेत. मधुसूदन नानिवडेकर, सेलेस्तिन शिरोडकर, डॉ. अनिल धाकू कांबळी, लीलाधर घाडी, दादा मडईकर, मोहन कुंभार, आ. सो. शेवरे, उत्तम पवार, श्रीमती उषा परब, श्रीमती संध्या तांबे, विठ्ठल कदम, गोविंद काजरेकर, डॉ. अनुजा जोशी, श्रीमती कल्पना बांदेकर, वीरधवल परब, श्रीमती कल्पना मलई हे कविसंमेलनात सहभागी होणार आहेत, अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी म्हणाले, दुसऱ्या दिवशी १९ जानेवारी २०१४ रोजी पहिल्या सत्रामध्ये सकाळी ११ ते १ पर्यंत प्रकट मुलाखत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली आहे. मुलाखतकार प्रवीण बांदेकर, गोविंद काजरेकर हे आहेत. सत्र दुसरे परिसंवाद १९ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ५ ते ७ पर्यंत विषय ‘सिंधुदुर्ग’चे साहित्य-संस्कृतीतील योगदान, या विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अल्ताफ खान हे असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे हे उपस्थित राहणार आहेत. प्रशांत सवाई, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात वक्ते म्हणून डॉ. शरयू आसोलकर, प्रवीण बांदेकर, प्रा. वृंदा कांबळी, रमेश कासकर, प्रा. नामदेव गवळी हे असतील. जिल्हाधिकारी म्हणाले, शेवटच्या दिवशी परिसंवाद व समारोप २० जानेवारी  २०१४ रोजी होणार आहे. परिसंवादाची वेळ सकाळी ११ ते १ पर्यंत आहे. परिसंवादाचा विषय आहे ‘आम्ही का वाचतो आणि काय वाचतो’ अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, दिलीप पांढरपट्टे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसाद घाणेकर, श्रीपाद कशाळीकर, अशोक करंबळेकर, प्रा. अनिल फराफटे, आनंद वैद्य, श्रीमती वंदना करंबेळकर यांचा परिसंवादात सहभाग आहे. ग्रंथप्रदर्शनात ६ स्टॉल्सचा सहभाग आहे. लोकराज्य मासिक स्टॉल, पर्यटन पुस्तिका स्टॉल, शासकीय मुद्रणालय कोल्हापूर, वैजयंती प्रकाशन, विघ्नेश बुकडेपो, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचेही स्टॉल लागणार आहेत. नावाजलेली व दुर्मीळ पुस्तके या ग्रंथप्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. या ग्रंथप्रदर्शनाचा जनतेने लाभ घ्यावा व ग्रंथोत्सव २०१४ हा यशस्वीपणे पार पाडावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा