छत्रपती शिवरायांची सर्वात जुनी व दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारा स्मृतिग्रंथ राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, प्रा. नरहर कुरुंदकर, सर यदुनाथ सरकार, सेतुमाधवराव पगडी यांच्यापासून ते आजच्या पिढीतील डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारख्या अनेक दिग्गज अभ्यासकांचे लेख आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हा स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथात शिवरायांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची संरक्षण संघटना, त्यांचे आरमार, राज्यकारभार, संस्कार आणि शिक्षण, राज्याची बांधणी, धर्मनिरपेक्षता अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकात समावेश असलेल्या शिवरायांच्या चित्रांमध्ये त्यांचे हेग येथील संग्रहालयातील असलेले व्हॅलेंटिन या डच चित्रकाराने काढलेले चित्र, आर्म या लेखकाच्या १७८२ सालच्या ‘फ्रॅग्मेंट्स’ या ग्रंथात प्रसिद्ध झालेले चित्र, लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेले १७ शतकाच्या उत्तरार्धातील चित्र, १६८५ मधील दख्खन शैलीतील चित्र यांच्यासह सात चित्रांचा समावेश आहे. याशिवाय शिवरायांनी विस्तार केलेल्या स्वराज्याचा नकाशाही त्यात आहे. या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखालील संपादक मंडळाने केले आहे. या ग्रंथात न्या. रानडे, नरहर कुरुंदकर, जदुनाथ सरकार, सेतू माधवराव पगडी, आ. ह. साळुंखे यांच्याबरोबरच डॉ. अ. रा. कुलकर्णी, वा. सी. बेंद्रे, डॉ. अप्पासाहेब पवार, त्र्यंबक शंकर शेजवलकर, डॉ. बाळकृष्ण, कृष्णराव अर्जुन केळुस्कर, गोविंद सखाराम सरदेसाई, गो. नी. दांडेकर, डॉ. भा. कृ. आपटे, प्रा. ग. ह. खरे, लेफ्टनंट कर्नल म. ग. अभ्यंकर यांच्या लेखांचा समावेश आहे. उत्तम निर्मिती असलेल्या या ग्रंथाची मूळ किंमत २४७ रुपये असून, ३० टक्के सवलतीत तो १७४ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
शिवरायांचे व्यक्तिमत्त्व व दुर्मिळ चित्रे असणारा स्मृतिग्रंथ प्रकाशित
छत्रपती शिवरायांची सर्वात जुनी व दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारा स्मृतिग्रंथ राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
First published on: 04-12-2012 at 05:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book on personality of shivaji and rare photograph release