BookMyShow removed stand-up comedian Kunal Kamra from its artist list on platforms : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करणाऱ्या विडंबनात्मक गाण्यामुळे गेल्या काही दिवासंपासून चर्चेत आहे. या प्रकरणी कामरा याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. तसेच त्याला चौकशीसाठी हजर राहाण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन्स देखील बजावले आहेत. यादरम्यान कुणाल कामरा याला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. ऑनलाईन तिकीट विक्री प्लॅटफॉर्म बुक माय शो (BookMyShow)ने शनिवारी कामरा याच्यासंबंधी सर्व मजकूर वेबसाईटवरून हटवला आहे. याबरोबरच कलाकारांच्या यादीमधून कुणाल कामरा याचे नाव देखील काढून टाकले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद्र यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना पक्षाचे नेते राहूल एन कनाल यांनी बुक माय शोला पत्र लिहून कामरा याचे प्रमोशन करू नये तसेच त्याला व्यासपीठ देऊ नये अशी विनंती केली होती. त्याच्या एका दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

कामराच्या आगामी शोच्या तिकिटांची विक्री केली जाऊ नये अशी विनंती कनाल यांनी बुक माय शोला केली होती. “त्यांच्या कार्यक्रमांसाठी तिकिटांची विक्री सुरू ठेवणे करणे हे त्यांच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण करणाऱ्या वक्तव्याला पाठिंबा म्हणून पाहिले जाऊ शकते, ज्याचा शहरातील सार्वजनिक भावना आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो,” असे कनाल त्यांच्या पत्रात म्हणाले होते.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यानंतर शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अटकपूर्व जामीनासाठी कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही.

कुणाल कामराने काय केलं?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई येथील काँटीनेंटल हॉटेलमध्ये एक शो केला होता. ज्यामध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात त्याने कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं. या शोचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये त्याने हा शो केला त्याचीही तोडफोड शिवसैनिकांनी केली. तसेच कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.