सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात साताऱ्यात पर्यटनाला चालला देण्यात आली आहे. याबरोबरच सावित्रीबाई फुले स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. मुनावळे,कोयना हेळवाक जलपर्यटन, नेहरू उद्यान, कोयना नगरला रोपे वे, स्कायवॉकची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. अर्थसंकल्पात नवीन महाबळेश्वर प्रकल्प व पर्यटनाला चालना देण्यात आली आहे, मात्र पूर्वापार पर्यटन असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर नव्याने कोणत्याही पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात दिसला नाही.
अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला ‘बूस्टर’ देणाऱ्या घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या. त्यानुसार खंडाळा तालुक्यातील नायगावात दहा एकर क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व कौशल्य विकास -उमेद प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर जावली तालुक्यातील मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करणे, हेळवाक (ता. पाटण) येथे कोयना जलपर्यटन प्रकल्पाला मान्यता व कोयनानगर येथील नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण अशा महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात पर्यटनाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे. कोयना-हेळवाक, मुनावळे जलपर्यटन; नेहरू उद्यान, सावित्रीबाई स्मारक यांची घोषणा तसेच सावित्रीबाईंचे भव्यदिव्य स्मारक, प्रशिक्षण केंद्राला अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गती मिळणार आहे.
नायगाव (ता. खंडाळा) सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र वेगाने उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नायगावात दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती सोहळ्यानिमित्त केली होती. तसेच नायगावातील स्थानिक जनतेने नायगावात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी मोठ्या निधीची तरतूद केली जाणार असल्याचे यापूर्वी घोषित केले होते. त्याचा पाठपुरावाही त्यांनी केला.
मुनावळे जलपर्यटन खुले
मुनावळे (ता. जावली) जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली. त्यामुळे पर्यटकांना आता नवे दालन सुरू होणार आहे. मुनावळे प्रकल्प ४८ कोटींचा असून, ३ वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. वॉटर स्पोर्ट्स आणि पार्किंग मेन बोट क्लब ब्लिडिंग, रिसॉर्ट, स्कुबा, वॉटर बॉडी अशा अनेक बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे.
कोयनानगरला रोप वे, स्कायवॉक
कोयनानगर (ता. पाटण) रोप वे व स्कायवॉक उभारण्याची घोषणा बजेटमध्ये झाली आहे. तसेच कोयनानगर येथील नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हाती घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी निधीची तरतूद करून घेण्यात यश मिळवले.