मोदी, शहांना महाराष्ट्रात रिमोट कंट्रोल होऊन राज्य चालवायचयं, तर भाजपने महाराष्ट्राच्या विभाजनाचा घाट घातला असल्याची जळजळीत टीका करताना, जनता पेटून उठून महाराष्ट्रात फाळणीचे कटकारस्थान उधळून लावेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आपण एक आमदारच नव्हे, तर मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान करणार आहात. पुढील पाच वर्षांत आपणच मुख्यमंत्री असू असा छातीठोक दावा त्यांनी केला.  
कराड दक्षिणचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. ही भव्य सभा येथील दत्तचौकातील सर्वाधिक गर्दीची ठरली. सभेला चव्हाण कुटुंबीयांसह, काँग्रेसचे प्रवक्ते  महादेव शेलार, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, राजेंद्र यादव, शारदाताई जाधव, माथाडी कामगारनेते पोपटराव पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांची उपस्थिती होती. सभेत अपक्ष उमेदवार विद्युलता मर्ढेकर, राजू कदम व स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र शेवाळे यांनी चव्हाणांना जाहीर पाठिंबा दिला.
पंतप्रधान मोदी गल्लीबोळात प्रचार करीत फिरत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण, सीमेवर मोठय़ाप्रमाणात हल्ले सुरू असताना, मोदींना राजकारणाशिवाय कशालाही वेळ नाही. इट का जबाब पत्थरसे देंगे म्हणणारे शेपूट घालून गप्प का? देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री आहे का? अच्छे दिन कोठे आहेत?  शंभर दिवसात परदेशातून काळा पैसा आणणार होतात, तो आणला का? अशी टीका चव्हाण यांनी केली. गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. गुजरातने प्रगती केल्यास आनंदच आहे. पण, महाराष्ट्राचे खच्चीकरण करून गुजरातचा विकास करण्याचा घाट घातला जात असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा असून, पुन्हा पारतंत्र्याचे दिवस परत आणायचे नसतील, तर जातीयवाद्यांना आपल्या जवळही फिरकू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही आघाडीच्या सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळाला असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ४६ महिन्यात ३६ हजार फाईली हाताबाहेर केल्या. एवढं मोठ काम कोणत्याही मुख्यमंत्र्याने केले नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. इथल्या जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले. मोठा विश्वास ठेवला. त्यामुळेच विजयाची खात्री असून, कराड दक्षिणसह महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी मोठय़ा मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा