सोलापूर : आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू असताना अखेर त्यांनी मौन सोडत आपण काँग्रेस सोडून भाजपामध्ये कदापि जाणार नसल्याचा स्वच्छ निर्वाळा दिला आहे.
यासंदर्भात समाज माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी, मी काँग्रेसी म्हणून जन्मले, काँग्रेसमध्ये घडले आणि वाढले. शेवटी मरेनही काँग्रेसी म्हणूनच, अशा स्पष्ट शब्दांत आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. या माध्यमातून त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा खोटी ठरवत त्यावर पडदा टाकला आहे.
हेही वाचा – एकाच ‘एटीएम’वर दुसर्यांदा दरोडा; पूर्वी २६ लाख, आता सव्वा आठ लाख लांबविले
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांचे वडील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सक्रिय झाले आहेत. दरम्यान, त्यांनी गेल्या आठवड्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या एका हुरडा पार्टीत बोलताना आपण आणि कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून दोनवेळा पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केला होता. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. या पार्श्वभूमीवर अखेर आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन सोडून आपण काँग्रेस पक्ष अजिबात सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.