मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील सवर्ण व दलित यांच्यात उद्भवलेला वाद सामजंस्याने मिटविण्याचा गावकरी, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनातर्फे करण्यात आल्यानंतर या गावात संपूर्ण शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. या पाश्र्वभूमीवर आज रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी या गावाला भेट देऊन बेलाड येथील दोन्ही गटाच्या समाजाने एकोपा ठेवून आपापसात वाद मिटवावा. ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेऊन जागेबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
बेलाड येथील गावठाणाच्या जागेत ध्वज उभारण्यावरून दलित व सवणार्ंमध्ये वाद झाला होता. हे प्रकरण पोलिस ठाण्यांपयर्ंत गेल्यानंतर दोन्ही बाजूच्या नागरिकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यानंतर गावातील सवर्णांकडून दलितांना रोजगारासाठी न बोलावणे, किराणा दुकानावरून माल न देणे, पिठाच्या गिरणीवर धान्य दळू न देणे, असे प्रकार करण्यात आल्याचा आरोप होता. या अघोषित बहिष्काराविरोधात दलितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी व प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातील वाद सामजंस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही बहिष्कारासारखा मानवताहीन प्रकार करू नये, असे आवाहन समाजधुरिणांनी केल्यानंतर दलित व सवर्णांमध्ये सामजंस्य निर्माण झाले. सध्या तेथील गावकरी गुण्यागोविंदाने राहत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या गावात ५६ टक्के मतदानही झालेले आहे.  
आज नितीन राऊत यांच्यासोबत शासकीय अधिकारी, अ‍ॅड. एस. एस. मोरे, राजू सावळे, अशांत वानखेडे आदी उपस्थित होते. अध्यक्ष सी.एल.थूल व नितीन राऊत यांनी दोन्ही समाजाच्या बैठका घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी दोन्ही समाजाने एकत्र बसून मार्ग काढावा. बेलाडात वादातून ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा होऊ नये यासाठी मार्ग शोधावा. तसेच ग्रामपंचायतीने जागा देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करून एक आदर्श सरपंच होण्याचा मान मिळवावा. दोन्ही समाजावर गुन्हे दाखल झाल्याने त्याचा परिणाम तरुणांच्या नोकरीवर होऊ शकतो. हे प्रकरण गंभीर झालेले नसून त्यातून मार्ग काढल्यास शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल.
जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर व जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांनीही काल याबाबत उपाययोजना सुचवून दोन्ही समाजाने विचार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे प्रकरण अप्रिय असून दोन्ही समाजाने सकारात्मक भूमिका घेऊन वाद मिटवावा, असे अध्यक्ष सी.एल.थूल यांनी सांगितले.

Story img Loader