आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक संस्थांमध्ये असलेली भाजप-सेनेबरोबरची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीने घेतल्यानंतरही विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ांमध्ये घरोबा कायम आहे. आघाडीच्या नेत्यांनी दिलेले आदेश पाळायला स्थानिक नेते तयार नसल्याचे चित्र आहे.
राज्यात गेल्या एक तपापासून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार सत्तेत आहे. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढणाऱ्या या दोन्ही पक्षांचे नेते स्थानिक पातळीवरील राजकारणात मात्र एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात असतात. यातूनच विरोधी विचारसरणीच्या पक्षांना जवळ केले जाते. सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस व राष्ट्रवादीला अचानक या स्थानिक पातळीवरच्या युतीचे स्मरण होते आणि समन्वय समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झडते. महिन्यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश असलेल्या राज्य समन्वय समितीची बैठक मुंबईत झाली. त्यात स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी असलेली भाजप सेनेबरोबरची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात आता हा निर्णय होऊन महिना लोटला तरी स्थानिक पातळीवरचे नेते ही युती तोडायला तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्व विदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसला शह देण्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये भाजप व सेनेला जवळ केले. अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्हय़ांत सध्या अशीच सत्ता आहे. भाजप व शिवसेनेला सत्तेतून बाहेर केले तरी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता मिळवता येत नाही. त्यापेक्षा आहे ती सत्ता टिकवून ठेवण्यात काय गैर आहे, असा युक्तिवाद आता राष्ट्रवादीच्या वर्तुळातून केला जात आहे. येथील महापालिकेत काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवली आहे. काँग्रेसचे नेते सुद्धा ही युती तोडायला तयार नाहीत. यवतमाळ जिल्हय़ात राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भगव्या युतीला जवळ केले आहे. या पक्षाचे नेते सुद्धा समन्वय समितीचा निर्णय पाळायला तयार नाहीत.
येत्या काळात भाजप सेनेबरोबर युती करायची नाही, असेही समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले होते. तरी सुद्धा वर्धा नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून विजयी झाला. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर असतानाच ही निवडणूक झाली. त्यामुळे स्थानिक नेते समन्वय समितीच्या निर्णयाला अजिबात भीक घालत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.