संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : धुळे येथील राष्ट्रवादी भवनावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाला असून दोन्ही गटांनी कार्यालयाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले असताना राष्ट्रवादीतील या अंतर्गत वादाची किनार प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या राजीनाम्यालाही आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे-नंदुरबार प्रभारी माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी भवन सोडले. गोटे हे भवनाच्या बाहेर पडताच अजित पवार गटाने भवनावर धाव घेत कुलूप तोडून आत प्रवेश केला. भवन अजित पवार गटाचे असल्याचा दावा केला. अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी भवनात प्रवेश करून ठाण मांडल्याची बातमी कळताच शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष रणजितराजे भोसले यांनीही भवनात प्रवेश केला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही गटांतील संघर्ष तात्पुरता टळला असला तरी कार्यालय कोणाचे, याचा निकाल लागेपर्यंत वाद सुरूच राहणार आहे. दोन्ही गटांनी या इमारतीवर दावा सांगत भवनाला कुलूप लावल्याने कुठल्याही एका गटाला या कार्यालयात प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. यामुळे दोन्ही गटांतील सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काहीशी द्विधा झाली आहे.

अनिल गोटे यांनी पक्षपदाचा राजीनामा देण्यामागे दिलेले पक्षातील गटबाजी थोपविण्यात अपयश आल्याचे कारण दोन्ही गटांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सयुक्तिक वाटत नाही. गोटेंऐवजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांना याआधीच ताकद दिली आहे. काही महिन्यांपूर्वी धुळे दौऱ्यावर असताना गोटे यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण टाळून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अचानक रणजितराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला होता. या अनपेक्षित निर्णयामुळे खुद्द भोसले यांची तारांबळ उडाली होती.  अजित पवार यांच्या गटातही पदांसाठी प्रतीक्षेत असलेले आणि जुने अशा दोन गटांत स्पर्धा आणि हेवेदावे आहेत.

पदांसाठी स्पर्धा

आगामी महापालिकेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून या दोन्ही गटांत पदांसाठी स्पर्धा आहे. अजित पवार गटाची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नसल्याने नवख्या कार्यकर्त्यांनी विविध मार्गाने आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सारंग भावसार हे अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. परंतु गोटे हे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याआधीच भावसार यांनी अजित पवार गटाची वाट धरली होती. त्यांना अद्याप पद देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी भवनावर दावा करण्यासाठी भावसार हेच आधी पोहचल्याने अजित पवार गटातर्फे ते चर्चेत आले आहेत. दुसरीकडे, गटबाजीमुळे आपण बाहेर पडल्याचे सांगणाऱ्या गोटे यांनी तूर्तास कोणत्याच पक्षात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या लोकसंग्राम पक्षाला पुन्हा उर्जितावस्था देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत गोटे यांची हीच भूमिका कायम राहते की बदलते, यावर इतर राजकीय पक्षांचेही लक्ष आहे.

राष्ट्रवादी भवनावर कोणताही एक गट दावा करू शकत नाही. तसा पक्षश्रेष्ठींचा आदेश नाही. आदेश आल्यावर राष्ट्रवादी भवन नेमके कुणाच्या ताब्यात राहील, हे स्पष्ट होईल. तोवर कार्यकर्त्यांनी वाद करू नये. चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल. – अर्जुन टिळे, पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हेच विश्वस्त आहेत. यामुळे साहजिकच शरद पवार यांच्या गटाचाच भवनावर अधिकार राहील. यासंदर्भात आपण नुकताच आढावा घेतला आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. – उमेश पाटील ,पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट