सोलापूर : क्रिकेट खेळताना हरवलेला चेंडू शोधण्याच्या नादात एका किशोरवयीन मुलाचा तोल गेल्याने विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ही दुर्घटना घडली. ओंकार संजय चव्हाण (वय १५, रा. कंदलगाव) असे या दुर्घटनेतील मृत मुलाचे नाव आहे. त्याने नुकतीच दहावीची माध्यमिक शालांत परीक्षा दिली होती. त्याचे आईवडील दोघेही लोहारकाम करून उदरनिर्वाह चालवितात.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंदलगाव शिवारात निंबर्गी रस्त्यावर असलेल्या विहिरीलगत मोकळे मैदान आहे. सायंकाळी ऊन उतरल्यानंतर मृत ओंकार याच्यासह काही मुले या मैदानावर क्रिकेट खेळत होती. एका मुलाने मारलेला चेंडू विहिरीच्या दिशेने गेला आणि हरवला. तो चेंडू शोधत असताना ओंकार हा विहिरीजवळ आला. परंतु अचानकपणे पाय घसरून तो ७० फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. परंतु, पायरी नसलेल्या खोल विहिरीत उतरणे कठीण होते. तरीही काही तरुणांनी दोरखंडाच्या साह्याने विहिरीत उतरून ओंकारचा मृतदेह बाहेर काढला.

मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता ओंकार हा विहिरीत कोसळल्यानंतर दगडावर आपटल्याने डोके फुटले आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष न्यायवैद्यक तपासणीअंती काढण्यात आला. मृत ओंकार हा अभ्यासात हुशार होता. त्याने गेल्या महिन्यात सोलापुरातील एका परीक्षा केंद्रातून दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर तो गावी आई-, वडिलांच्या घरी परतला होता. त्यांच्याकडून कष्टकरी आई-वडिलांची मोठी अपेक्षा होती. आपण आयुष्यभर  लोहार कामातून करीत असलेले कष्ट मुलाच्या नशिबी येऊ नयेत. तो शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा आणि घराण्याचे नाव वाढवावे, अशी अपेक्षा करणा-या आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूनंतर धक्का बसला आहे. कंदलगाव परिसरातही ओंकारच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हाळ्यात ग्रामीण भागात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणांसह लहान मुले विहिरी किंवा तलाव अथवा नदीच्या पात्रात पोहता येत नसल्याने किंवा दम लागल्यामुळे मृत्यू होतो. तसेच विहिरी, तलाव, ओढे-नाले आणि नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला तोल गेल्याने पाण्यात पडून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात अशा काही घटना घडल्या आहेत.