सातारा: एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकमध्ये ही घटना घडली. मुलीवर वार केल्यानंतर संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल राजेंद्र राजे (वय २५, रा. पिंपोडे बुद्रुक) असे संशयित युवकाचे नाव आहे.
उत्तर कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील एक अल्पवयीन मुलगी अकराववी मध्ये शिकत होती. आज रविवारी सकाळी ती बस स्थानक परिसरात खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी गेली होती. या संशयित युवकाने क्लासमध्ये जाऊन तिला चाकुने भोसकले व घटनास्थळावरून तो पसार झाला.
गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने सातारा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत युवकाने सुध्दा विषारी औषध प्राशन केले आणि नंतर तो संशयित स्वतः कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला कोरेगाव येथील दवाखान्यात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.