भंडारा : धूलिवंदनाच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी गावात घडली. चैतन्य राजेश मुटकुरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चैतन्य मुटकुरे हा उज्वल विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. धूलिवंदन खेळून झाल्यानतंर गावातील चार ते पाच मित्रांसोबत तो गावाजवळ असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेला होता. चैतन्य हा त्याचा मित्र नमन सुधीर चेटूले आणि इतर चार मित्रांसह पाण्यात उतरला. परंतु, चैतन्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही.
हेही वाचा – VIDEO : अन् म्हशी मागे धावताच वाघ जंगलात पळून गेला…
हेही वाचा – गडचिरोली : मारहाणप्रकरणी नाना पटोलेंच्या भावावर गुन्हा
या घटनेची माहिती गावात कळताच लोकांनी तलावाजवळ गर्दी केली. गावकऱ्यांनी चैतन्यचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि पोलिसांनादेखील या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेहाचा शोध सुरू केला. यानंतर काही तासांतच चैतन्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखनी येथे पाठविण्यात आला आहे.