जिल्ह्यात अवैध दारूच्या हातभट्टया बंद कराव्यात, या साठी महिलांनी वारंवार तक्रारी दिल्या. पोलीस विभागाने काही ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले. मात्र, अजूनही जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूचा महापूर वाहत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कुंभकर्णी झोपेतून जाग येत नाही. या पाश्र्वभूमीवर सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील ग्रामस्थांनी आता या प्रश्नी पुढाकार घेत अवैध दारूविक्री व उत्पादन ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी बंद न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील आदिवासी महिलांनी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढून अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. तोंडापूर येथील महिलांनी ७ जूनला आखाडा बाळापूर पोलिसांत निवेदन देऊन अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. वडचुना ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. पोलिसांनी गेल्या २५ जूनला दोन ठिकाणी छापे टाकून ३० लिटर दारू जप्त केली. मात्र, जिल्हाभर अवैध दारूची विक्री वाढत असल्याने ग्रामस्थांकडून तक्रारींत भर पडत असताना दारू बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टाळाटाळ होत आहे. यातूनच कापडसिंगी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन दारूविक्री व उत्पादन बंद करण्याची मागणी केली.

Story img Loader