सोलापूर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देशभर तीव्र भावना उमटत असताना बाजारपेठेत तुम्ही ‘या’ धर्माच्याच व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करा, इतर धर्माच्या व्यापाऱ्यावर आर्थिक बहिष्कार घाला, असे आवाहन करणारे फलक जाहीरपणे झळकावण्याचा प्रकार सोलापुरात घडला. त्याची पोलिसांनी दखल घेऊन संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे. यात समावेश सर्व जाती-धर्मांचे घटकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनसत्र चालविले आहे.तथापि, या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ आणि द्वेष पसरविण्याचाही प्रयत्न काही संघटनांनी चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापुरात नव्या पेठेसारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत काहींनी एकत्र येऊन आंदोलन करताना आक्षेपार्ह कृत्य केले. ‘त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, तुम्ही धर्म विचारून खरेदी करा’ अशा आशयाचा मजकूर असलेले फलक झळकावले गेले.
या घटनेची पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दखल घेत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन एम. राजकुमार यांनी केले आहे.