आदिपुरुष सिनेमाच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. हा सिनेमा रिलिज झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जाते आहे. या सिनेमातले संवाद हे आक्षेपार्ह आहेत. तसंच काही दृश्यंही अनाकलनीय आणि पुराणाचा संदर्भ नसणारी आहेत. त्यामुळेच या सिनेमावर प्रचंड टीका होते आहे. आदिपुरुषला ओपनिंग चांगलं मिळालं मात्र या सिनेमातली भाषा, प्रभू रामाचं चित्रण, सीतेच चित्रण, रावणाचे प्रसंग या सगळ्यावरच बहुतांश प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मागणी आता कालीचरण महाराजांनी केली आहे.
काय म्हटलं आहे कालीचरण महाराजांनी?
आदिपुरुष या सिनेमातल्या दाखवण्यात आलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. तसंच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे शब्द या सिनेमात वापरण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदूंनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे अशी मागणी कालीचरण महाराजांनी केली आहे. आदिपुरुष हा सिनेमा मी पाहिलेला नाही. जे लोक या सिनेमाला पाठिंबा देत आहेत ते धर्मविरोधी आहेत. ज्यांना वाईट वाटतं आहे ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत त्यांनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे असंही कालीचरण महाराजांनी म्हटलं आहे.
संत समितीचे अनिकेत शास्त्री यांनी काय म्हटलं आहे?
तर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी जे प्रमाणपत्र सेन्सॉरकडून दिलं जातं ते कसं काय दिलं? हा माझा प्रश्न आहे. तसंच इथून पुढे सेन्सॉर बोर्डाने अशा धर्मविघातक चित्रपटांवर बंदी आणावी आणि त्यांना प्रमाणपत्र देऊ नये अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रमुख अनिकेत शास्त्री यांनी ही मागणी केली आहे.
आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी तोडफोडही झाली. अशातच पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथे एका थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. काही हिंदू संघटनांनी चित्रपटाचे शो बंद पाडले व गोंधळ घातला.