Phule Movie Row: झी स्टुडिओज् प्रस्तुत, अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांची मुख्य भूमिका असलेला ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजात केलेल्या परिवर्तनवादी सुधारणांवर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. हिंदू महासंघाने चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रपटातील काही दृश्यांवर नाराजी व्यक्त केली.
आनंद दवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, आम्ही चित्रपटाचे मनापासून स्वागतच करतो. असे चित्रपट प्रदर्शित व्हावेत. पण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड-शेण फेकताना दिसला आहे. हा प्रकार दाखविण्यास आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुल्यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोक, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हादेखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे.
महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद करायचा आहे
फुले चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलरमधून वेगळे चित्र दाखवत महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद करायचा आहे, हे स्पष्ट होते. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही, असे हिंदू महासंघाचे मत आहे, अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली.
महात्मा फुलेंच्या कार्यात आमचेही योगदान आहे, हे जर ट्रेलरमध्ये दाखविले गेले असते, तर अधिक चांगले झाले असते, असेही दवे म्हणाले आहेत. प्रत्येक काळात समाजातील काही व्यक्ती विचित्र वागलेल्या आहेत. पण त्यांचे वागणे संपूर्ण समाजाचे मत नसते. आमच्या भावनांचा निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाने विचार करावा आणि तसे बदल करावेत. हवे तर काही दिवस चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशीही मागणी आनंद दवे यांनी केली. तत्पूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणार
आनंद दवे पुढे म्हणाले की, ११ एप्रिल रोजी आम्ही चित्रपट जाऊन पाहू. जर चित्रपटात एकांगी चित्रण केले असेल तर त्यापुढे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
प्रतीक गांधी साकारणार महात्मा फुले साकारणार
सोनी लिव्हवरील गाजलेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरीजमधील अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा राव साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी सांगितले.