राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही “नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत”, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मोहन भागवत आणि आरएसएसला विधानावर अंमलबजावणी करण्याचाच सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांविषयी मोहन भागवतांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. आता ब्राह्मण महासंघानंही भागवतांच्या विधानावर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची गरज असल्याचं विधान नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली”, असं म्हणत ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं, असं मोहन भागवत म्हणाले. तसेच, देशातून जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था हद्दपार व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“त्यांनी भाजपा नेत्यांना…”, जातीव्यवस्थेसंदर्भातील मोहन भागवतांच्या विधानावर जयंत पाटलांची खोचक टीका!

“अभ्यासाशिवाय केलेलं वक्तव्य”

दरम्यान, मोहन भागवतांच्या या विधानावर ब्राह्मण महासंघानं तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “त्यांचं वक्तव्य चुकीचं आणि पूर्ण अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. पण असं न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं”, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे.

“मोहन भागवतांनीच पापक्षालन करण्याची गरज आहे. इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचं पाप तुम्ही करण्याचा विचार करत आहात. तुम्ही पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही देशात जातीयवाद वाढवत आहात”, अशा शब्दांत आनंद दवेंनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

“वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था समाजातून हद्दपार व्हायला हवी”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन!

शरद पवारांचा खोचक सल्ला!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भागवतांच्या विधानावर सहमती दर्शवत त्यांना सल्लाही दिला. “मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahman mahasangh targets rss chief mohan bhagwat cast system statement pmw
Show comments