घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. मात्र, इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हक्कांची अंमलबजावणी होण्यामध्ये उच्चवर्णीय हिंदू हेच आडवे येत आहेत. उच्चवर्णीय हिंदू हेच ओबीसींचे मारेकरी आहेत, असा आरोप सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी रविवारी केला.
सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे ‘आता ओबीसी बुद्ध धम्माच्या वाटेवर’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तिसऱ्या ओबीसी महापरिषदेचे उद्घाटन महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी हनुमंत उपरे बोलत होते. आंबेडकरी चळवळीतील नेते राजा ढाले यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. हनुमंत उपरे म्हणाले, काकासाहेब कालेलकर आयोग ते मंडल आयोग या वाटचालीमध्ये ओबीसींसाठी दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी झालेली नाही. लोकसभेमध्ये कायदा संमत होऊनही ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. त्यामुळे उच्चवर्णीय िहंदू हेच आमच्या हक्कांच्या आड येतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजजागृतीसाठी हे अभियान राबविले जात असून ही सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई आहे. चौथी परिषद औरंगाबाद येथे होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक येथेही परिषद होणार आहे. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी किमान पाच लाख ओबीसी बौद्ध धर्माचा स्वीकार करतील, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. राजा ढाले म्हणाले, जातव्यवस्था बळकट करण्याचे काम सरकारच्या पातळीवर होत आहे. तसेच ते ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आमच्या भिंतीवर कालनिर्णय असणार नाही असा संकल्प करण्याची वेळ आली आहे. ओबीसींना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठीच हे अभियान राबविले जात आहे. बाबासाहेबांनी घटनेद्वारे दिलेल्या अधिकारातून ‘एक मूल्य एक मत’ हे समीकरण अस्तित्वात यावे त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. न्यायावर आणि बुद्धिवादावर आधारित समाजाची निर्मिती हेच या अभियानाचे ध्येय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा