जिल्ह्यात ६३५ पोलीस पाटलांच्या मंजूर जागांपकी २९४ जागा रिक्त असून त्याची भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या बेतात असतानाच निवडणूक आचारसंहिता     लागल्याने भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. आचारसंहितेनंतर पोलीस पाटील भरतीसाठी पारदर्शक तीन सदस्य समितीची नेमणूक करून रिक्त पदे भरली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या २९४ जागा रिक्त आहेत. गावपातळीवर माहिती घेण्यासाठी तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा समस्या निर्माण होतात. पोलीस पाटलांची रिक्त पदे असलेल्या गावातून पोलीस विभागाला आवश्यक माहिती तातडीने मिळत नाही. त्यामुळे पोलीस विभागाला माहिती घेण्यासाठी खबऱ्यांना खुश करण्याची वेळ आली आहे. खबऱ्यांकडून पोलिसांना आवश्यक माहितीची जमवाजमव करताना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या बेतात असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे भरतीला ब्रेक लागला. आचारसंहिता संपताच रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
पोलीस पाटील भरतीबाबत पूर्वीचे सर्व नियम निकाली निघाले आहेत. आता पोलीस पाटील भरतीसाठी ८० गुणांची लेखी, तर २० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेच्या ८० गुणांचे नियोजन करण्यासाठी, तसेच परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी समिती स्थापन केली आहे. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे आयोजन, प्रश्नपत्रिका तपासून निकाल तयार करण्याचे काम समितीवर सोपविले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील तर पोलीस उपअधीक्षक सदस्य व संबंधित सर्व तालुक्यांचे तहसीलदार सदस्य सचिव आहेत. समितीमार्फत पोलीस पाटलांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Story img Loader