वसतिगृहाच्या भिंती पाझरत आहेत आणि प्यायला पाणी नाही. मैदानी खेळासाठी जागाच नाही, वाचनालयात पुस्तके नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयात मायक्रोस्कोपच चांगले नाहीत. शैक्षणिक साधनांचा पत्ता नाही. दंत महाविद्यालयात दात बघण्यासाठीची खुर्ची नीट नाही. एकच हातमोजा दोन रुग्णांना वापरा, असे सांगितले जाते. सांगा, कसे शिकायचे? अशी प्रश्नांची सरबत्ती वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली, तेव्हा वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हसऱ्या छबीचे छायाचित्र कॉफीच्या कपावर उमटवून ब्रँडिंग सुरू होती.
आघाडीच्या साडेचार वर्षांत नव्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर ‘कॉफी विथ स्टुडंट’ उपक्रम आव्हाड यांनी हाती घेतला. पण त्याला राजकीय रंग असल्याचे विद्यार्थ्यांच्याही लक्षात आले. शेवटी मतदान करा म्हणजे बदलून दाखवू, असे म्हणत आव्हाडांनी वेगवेगळ्या समस्यांसाठी घाटी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यासारखे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाची नक्कल वाटावी, असा कार्यक्रम आव्हाड यांनी हाती घेतला. औरंगाबाद येथे या कार्यक्रमात ज्या कपातून कॉफी देण्यात आली, त्यावर आव्हाडांची छबी होती. केवळ मान्यवरांच्या कपावर तशी छबी नाही, तर मुलांना देण्यात आलेल्या कपांवरही आव्हाडांनी ब्रँडिंग केले. तत्पूर्वी आव्हाड कार्यकर्त्यांना भेटले, तेव्हा त्यांच्या अंगावर नेते सहसा वापरतात तो पांढऱ्या रंगाचा पोषाख होता. आलिशान गाडीतून कार्यक्रमास आले, तेव्हा त्यांनी पोषाख बदलला होता. अंगावर कोट चढवला होता.
कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांची छबी असणारे कॉफी कप दिले गेले आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नांना सुरुवात केली. सूत्रसंचालक बीडचा. ग्रामीण ढंगातच तो म्हणाला, ‘कॉफीवर चर्चा, होऊन जाऊ द्या खर्चा, निधी तर मिळणारच.’ कार्यक्रमाचे स्वरूप स्वत:च अनौपचारिक केल्याने विद्यार्थ्यांनी जी गाऱ्हाणे मांडायला सुरुवात केली, तेव्हा स्वत: आव्हाडही ब्रँडिंगचा कप विसरले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी प्रश्नांची सरबत्ती केली. पहिल्या काही प्रश्नात मंत्रिमहोदयांना वाटले, आपण जिंकून घेऊ सारे. त्यांनी स्वत:च घोषणा केली, सगळी वाचनालये वातानुकूलित होतील. वसतिगृहात वाय-फाय लावून देऊ. त्यावरून त्यांनी विनोदही केला. पण मग विद्यार्थी जे सुटले, त्यांना थांबवता येणेच अवघड होऊन बसले.
एक विद्यार्थिनी म्हणाली, मैदान आहे, तेथे मुलींनी जावे, असे वातावरणच नाही. बाह्य़रुग्ण तपासले जातात, त्याच ठिकाणी ठराविक कालावधीनंतर बॅडमिंटन खेळावे लागते. कारण त्यासाठी वेगळी व्यवस्थाच नाही. कोणी सांगितले जिमखाना नाही, कोणी सांगितले रात्री साडेदहानंतर पिण्यासाठी पाणीदेखील मिळत नाही. कोणी सांगितले, तास वेळेवर होत नाही. काहींनी शैक्षणिक साधने नसल्याची तक्रार केली. विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात. समस्यांची जंत्रीच जंत्री तयार झाली. एकेक प्रश्नावर अधिकाऱ्यांना खडसावण्यापलीकडे आव्हाडांनाही फारसे काही करता आले नाही. कॉफीचा कप थंड झाला आहे, असे वाटले की त्यांच्या समोरचा कप बदलला जाई. मी सगळ्या समस्यांकडे लक्ष देईन, वसतिगृहात येईन, भोजनालय बघेल, सगळे काही करेन. पण विधानसभा निवडणुकीत लक्ष असू द्या, असे आव्हाडही अधूनमधून सांगत होते. विद्यार्थ्यांनाही ते कळत होते.
‘घाटीचा पाणीपुरवठा २४ तासात सुधारा’!; मंत्री आव्हाडांचा आदेश
वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रम ठरवताना यापुढे विद्यार्थी संसदेच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केला. घाटी रुग्णालय, तसेच वसतिगृहात शुद्ध पाणीपुरवठय़ाची व्यवस्था २४ तासात करावी, असे आदेश देतानाच मायक्रोस्कोप किती आहेत आणि ते कोणत्या अवस्थेत आहेत, हे तपासण्यासाठी समितीही नियुक्त केली. भरती प्रक्रियाही ६० दिवसांत हाती घेतली जाईल, असे आव्हाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
‘कॉफी विथ स्टुडंट’ असे कार्यक्रमाचे नाव ठरवून विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना आव्हाड यांनी घाटी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वसतिगृहात शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली. रात्री दहानंतर पाण्यालाही कुलूप लावले जाते, असे सांगायलाही कमी केले नाही. त्यामुळे आव्हाड चांगलेच चिडले. हे सहन होऊ शकत नाही, असे सांगत २४ तासात सगळ्या वसतिगृहांवर शुद्ध पिण्याचे पाणी मिळायलाच हवे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले. वसतिगृहाच्या सुरक्षेविषयीही विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या. संरक्षित भिंतीची उंची वाढवा. गवत वाढले. साप, विंचू आत येतील. किमान तिकडे लक्ष द्या, असेही एकीने सुनावले. काही मुलांनी भिंतीतून पाझर होतो, इमारतही मोडकळीला आली, अशा तक्रारी केल्या. या प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधू, असे आव्हाड विद्यार्थ्यांना सांगत होते.
अभ्यासक्रम ठरविणारी समिती वयाने मोठी आहे. ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि विद्यार्थ्यांना वेगळेच हवे असते. त्यामुळे या पुढे अभ्यासक्रम ठरवताना विद्यार्थी संसदेच्या प्रतिनिधींनाही चर्चेसाठी बोलविले जाईल, असे ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वाचनालय ई-लायब्ररीच्या स्वरूपात आणण्यासाठी परदेशातील विद्यापीठाशी संपर्क साधला असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या ५०० जागा कमी होत आहेत. त्या कोणत्याही स्थितीत कमी होऊ दिल्या जाणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना दिले. रेल्वेची भाडेवाढ अमानवीय असल्याची टीकाही त्यांनी केली.

Story img Loader