देश बलवान करायचा असेल आणि सामान्य माणसांच्या जीवनातील आर्थिक अंधार दूर करायचा असेल तर सरकार किंवा परमेश्वरावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी धाडसी प्रकल्प साकारण्याची गरज भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या जामसंडे येथील आंबा फळप्रक्रिया प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी गडकरी बोलत होते. या वेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी आमदार आप्पा गोगटे, आमदार प्रमोद जठार, आमदार आशीष शेलार, भाजप प्रवक्ता माधव भंडारी, संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, चेंबर्सचे अध्यक्ष आशीष पेडणेकर आदी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली तरी रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार असे प्रश्न कायम आहेत. रोटी, कपडा, मकान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवे असे नितीन गडकरी म्हणाले. देश धनवान व जनता गरीब असे चित्र सध्या आहे. त्यामुळे गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम कार्यकर्त्यांना स्वत:चे कटआऊट लावून मिरवावे लागणार नाही, असे नितीन गडकरी म्हणाले.
भाजपने सामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले आहे. या जनसेवेतून राजकारण करत सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करत बदल घडविण्याची तयारी हवी. आपली सामाजिक बांधीलकी अंगीकारून देश बलवान करताना सुखी व समृद्ध जनतेला शक्तिमान करण्याची गरज आहे, तसे झाल्यास सरकार व परमेश्वरावर अवलंबून जनतेला राहावे लागणार नाही असे गडकरी म्हणाले.
देवगड आंबा उत्पादक संघाच्या साडेचार कोटीच्या आंबा फळप्रक्रिया धाडशी प्रकल्पाचे कौतुक करून नितीन गडकरी म्हणाले, विकासाचे प्रकल्प राबवून सामाजिक व आर्थिक प्रगती साधत गरिबांचे अश्रू पुसल्यास जनता तुमच्या मागे राहील. त्यामुळे विकासातून मतांचे राजकारण करा असे आवाहन केले.
विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे म्हणाले, आंबा प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती आणि आंबा बागायतदारांना हमीभाव मिळवून देण्याचा धाडसी निर्णय या संस्थेने घेतला आहे. त्याचे कौतुक करून आंबा उत्पादनातून प्रक्रिया करताना बारमाही प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावे असे आवाहन केले. आमदार तावडे म्हणाले, साखर कारखाना होत आहे. त्यासाठी पडीक जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन साखर प्रकल्पासाठी ऊस लागवड व्हावी असे आवाहन करून व्हिजन नसणारे सरकार राज्यात कार्यरत असून, पुढील १० वर्षांचे व्हिजन ठेवून सरकार चालविणे आवश्यक आहे, असे आमदार तावडे म्हणाले.
या वेळी माजी आमदार आप्पा गोगटे, आमदार प्रमोद जठार, अॅड. अजित गोगटे यांनी विचार व्यक्त केले.
आर्थिक अंधार दूर करण्यासाठी धाडसी प्रकल्प साकारण्याची गरज – नितीन गडकरी
देश बलवान करायचा असेल आणि सामान्य माणसांच्या जीवनातील आर्थिक अंधार दूर करायचा असेल तर सरकार किंवा परमेश्वरावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी धाडसी प्रकल्प साकारण्याची गरज भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2013 at 02:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brave project is needed to remove economical dark nitin gadmari