निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व त्यांचे प्रतिस्पर्धी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह आठ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तेलंगी पाच्छा पेठेत जाहीर सभा घेतली होती.  या सभेसाठी अधिकृत परवानगी घेणे अपेक्षित होते. परंतु अशी कोणतीही परवानगी न घेता सभा घेण्यात आली. याप्रकरणी संयोजक बाळू लोला व आमदार प्रणिती शिंदे आदी तिघा जणांविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सामान्य मतदारांना घरकुले देण्याचे आमिष दाखवून मते मागितल्याप्रकरणी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, आडम मास्तर यांचे विरोधक मुसा मुर्शद यांनी हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार घरकूल संस्थेच्या माध्यमातून घरकुले देण्याचे आमिष दाखवून मतदारांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आडम मास्तर यांच्यासह माकपच्या माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख आदींच्या विरोधात पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार जेलरोड पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी अद्यापि जाहीर झालेली नसतानाच आमदार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने मतदान होण्यासाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपा मतदारांना वितरित केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती. याबाबत चौकशी होऊन त्यात काँग्रेसचे प्रदेश सचिव धर्मा भोसले व खमितकर इन्फोटिकच्या मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader