शहरातील कुमठा नाका भागातील ब्रिटिशकालीन कुष्ठरोगी वसाहतीतील वीजपुरवठा केवळ २० हजारांचे बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने १५ दिवसांपूर्वी तोडला आहे. वीज खंडित झाल्याने तेथील दुर्दैवी कुष्ठरोगी अंधारातच चाचपडत जीवन जगत आहेत. यात सोलापूर महापालिका व महावितरण कंपनी दोघेही संवेदनशील नसल्याचे दिसून येते.
मिळकतकराच्या थकबाकीपोटी यापूर्वी पालिका प्रशासनाने एका शाळेच्या इमारतीला कुलूप ठोकल्याची घटना अद्यापि ताजी असतानाच आता त्यापुढचा कहर म्हणजे वीज वितरण कंपनीने कुष्ठरोगी वसाहतीत अवघ्या २० हजारांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे. कुमठा नाका परिसरात शेकडो कुष्ठरोगी कुटुंबीयांसह राहतात. ब्रिटिशकाळापासून ही वसाहत अस्तित्वात आहे. परंतु अलीकडे या वसाहतीत राहणाऱ्या कुष्ठरोगींना अक्षरश: नरकयातनेचा अनुभव घेत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. घरे मोडकळीस आली असून अनेक घरांवरील छपरे केव्हाच उडाली आहेत. अन्नधान्याचाही      सतत तुटवडा असतो. तर तेथील दवाखान्यातील रुग्णसेवाही केवळ नावापुरतीच उरली आहे. याच कुष्ठरोगी वसाहतीसमोरील मोकळय़ा मैदानावर मेलेली जनावरे आणून टाकली जातात. म्हैस, गाय, बैल, गाढवांपासून ते अगदी कुत्री-मांजरापर्यंत प्रत्येक मेलेल्या जनावराच्या कुजलेल्या प्रेताची दरुगधी शेवटी कुष्ठरोगींनाच सहन करावी लागते. एकीकडे ही दरुगधी असताना लगतच उघडय़ावर स्मशानभूमीही अस्तितात आहे.
या अशा पृथ्वीवरील ‘नरका’मध्ये कुष्ठरोगी नरकयातना भोगत असताना त्यात कहर म्हणजे वीज खंडित झाल्यानंतर वीजबिल कोणी भरायचे, यावर पालिका प्रशासनात संबंधित फाइल आरोग्य विभाग ते आयुक्त आणि पुन्हा आयुक्त ते आरोग्य विभाग असा खाली-वर प्रवास करीत आहे. त्यावर निर्णय अद्यापि प्रलंबित आहे. तर दुसरीकडे एरव्ही धनदांडग्यांकडे लाखोंचे वीजबिल थकले तरी त्यांच्याकडील वीजपुरवठा खंडित करताना महावितरण कंपनीचे हात थरथरतात. तर कुष्ठरोगी वसाहतीसारख्या भागातील वीज २० हजारांसाठी तोडली जाते. या प्रश्नावर कुष्ठरोगी स्त्री-पुरुषांनी महापालिकेत बुधवारी दुपारी रणरणत्या उन्हात धडक मारली. परंतु त्यांना प्रभारी आयुक्त भेटले ना पदाधिकारी. पालिकेत पूर्णवेळ आयुक्त नाहीतर पदाधिकारीही अर्थसंकल्प तयारीच्या नावाखाली महापालिकेत येत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा