रायगडमध्ये लाचखोरीविरुद्ध कारवाई थंडावली ; चार महिन्यांत ३३ लाचखोर जेरबंद 

टेबलाखालून पसे दिल्याशिवाय कोणतेही सरकारी काम होत नाही, असा प्रत्यय नागरिकांना वेळोवेळी येतो. यामुळे भ्रष्टाचार वाढू लागला असून, मागील वर्षांच्या तुलनेत कोकण विभागात १ जानेवारी ते १० एप्रिल २०१९ दरम्यान लाचखोरीची ३३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोकण विभागाचा विचार केल्यास रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लाचखोरीची सर्वात कमी प्रकरणे समोर आली असून, ठाणे जिल्हा लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येते.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे; परंतु लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढत चालली आहे. बहुसंख्य सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. तसेच अनेक जण त्वरित शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देऊन मोकळे होतात, यामुळेही भ्रष्टाचार वाढत चालला आहे. मात्र रायगड जिल्ह्य़ात लाच स्वीकारण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आशादायी चित्र दिसून येते.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १० एप्रिल दरम्यान कोकण विभागात ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली. या सर्व प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे रचत ४६ जणांना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यास रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लाचखोरी कमी असल्याचे दिसून येते, तर ठाणे जिल्ह्य़ात सर्वात जास्त लाचखोरीची प्रकरणे घडली आहेत. ठाणे जिल्ह्य़ात लाचखोरीची १८ प्रकरणे उघडकीस आली असून, पालघर जिल्ह्य़ात ५, रत्नागिरी, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी ३, तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रत्येकी २ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

मागील वर्षांच्या तुलनेत लाचखोरी वाढली

१ जानेवारी ते १० एप्रिल २०१८ मध्ये कोकण विभागात २८ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये २७ प्रकरणांमध्ये सापळे रचीत आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले होते, तर एक अन्य प्रकारच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण होते, तर चालू वर्षांत १० एप्रिलपर्यंत लाचखोरीची ३३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये सापळे रचत आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपतची जनजागृती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दर वर्षी ३१ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह राबवला जातो. गर्दीची ठिकाणे, शाळा- महाविद्यालये, बस स्थानके आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विरोधात पुढे येण्याचे आवाहन सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येते. पत्रके, पोस्टर, फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. तरीदेखील लाचखोरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत.