Mumbai Goa Expressway Bridge Collapse in Chiplun: सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत चिपळूण येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचा एक गर्डर खाली कोसळला होता. मात्र काही कालावधीनंतर उड्डाण पूलाचा काही भाग देखील खाली कोसळला आहे. पुलाचे काम करणारी क्रेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक सोमवारी सकाळी उड्डाणपुलाचा गर्डर खचल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर थोडा वेळ काही झाले नाही. मात्र आता मात्र उड्डाणपुलाचा काही भागच खाली कोसळला आहे.
”सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान काम सुरु असलेल्या उड्डाणपुलावरील गर्डर कोसळला होता. मात्र त्यावेळेस एवढे नुकसान झाले नव्हते. मात्र दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमार त्या उड्डाणपुलाचा काही भाग खाली कोसळला. तसेच त्यावर काम करत असणारी क्रेन देखील पूर्णपणे खराब झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग उचलण्यासाठी दोन अधिक महिन्यांचा कालावधी लागू शकतो”, असे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणातील किमान एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. मात्र या कामी तितकेसे यश आले नाही. अजूनही एकेरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परंतु गेल्या महिनाभरात चिपळूण हद्दीत कामाचा वेग वाढला होता. विशेषतः शहरातील बहाद्दूरशेख नाक्यातील उड्डाण पुलाच्या कामाला चांगली गती मिळाली होती. सुरुवातीला शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतराचा हा उड्डाण पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर नुकतेच मुख्य नाक्यातील अवघड टप्प्यातील काम सुरु करण्यात आले होते.