अमेरिका, कॅनडा येथील ३५०० लोकांच्या दमदार उपस्थितीत  प्रोव्हिड्न्स येथे भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६व्या अधिवेशनाची िदडी, भावगीत, लावण्या यांच्या साथीने सुरुवात झाली.
बीएमएमचे अध्यक्ष आशीष चौघुले यांनी सर्वाचे स्वागत केले. बीएमएम या संघटनेची आणि तिच्या उपक्रमाची ओळख करून दिली.  
प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर यांनी ‘एवढय़ा मोठय़ा संख्येने भारताबाहेर मी प्रथम मराठी मंडळी एकत्र आलेली बघतो आहे; याचा मला अभिमान आहे, मराठीपण कुठे जपले जात असेल तर ते भारताबाहेर, परदेशात अमेरिकेत!’ असे सांगून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके, न्यूयॉर्कचे काउन्सेलर जनरल ज्ञानेश्वर मुळे, कॉसमॉस बँकेचे जयंत शाळिग्राम, न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे बाळ महाले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यजमान न्यू इंग्लंड मंडळाने िदडी, भावगीत आणि लावण्या यांचा समावेश असलेला उद्घाटनाचा कार्यक्रम सादर केला. लहान मुलांसह सर्व स्थानिक कलाकारांचा उत्साह आणि त्यांची तयारी कौतुकास्पद होती.
अधिकाधिक चांगल्या आयोजनाची परंपरा या अधिवेशनानेही कायम ठेवली. यंदाच्या अधिवेशनाचे आयोजन, जेवण आणि उपस्थितांची व्यवस्था यात कोठेही कसर नव्हती. स्वयंसेवक आणि ठिकठिकाणी लावलेले माहितीचे फलक यामुळे सर्व रसिकांना कार्यक्रमाची माहिती आणि सर्वप्रकारची मदत लवकर मिळत होती. भारतातून आलेले फॅमिली ड्रामा हे नाटक, सौमित्र व वैभव जोशी यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कॉसमॉस बँकेने प्रायोजित केलेल्या बीएमएम २०१३ सारेगम स्पध्रेमध्ये कॅनडाचे दोघे- रवी दातार विजेता, समिधा जोगळेकर उपविजेती ठरली. प्रसन्न आढावकर याला तिसरे पारितोषिक मिळाले. भारतातून आलेल्या कलाकारांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. कमलेश भडकमकर आणि त्यांच्या वाद्यवृंदाने विशेष दाद मिळवली. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि राहुल देशपांडे हे या स्पध्रेचे परीक्षक होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या भरगच्च वेळापत्रकाकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader