मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे आणि मनसे अयोध्या दौऱ्यावर ठाम असताना बृजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जून रोजी नेमकं अयोध्येत काय घडणार? याविषयी उत्सुकता वाढू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ते बिळात राहतात, पहिल्यांदाच बाहेर येतायत”

बृजभूषण सिंह यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. “मी म्हणतो राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाही. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाही. पहिल्यांदा ते आले आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर घुसू देणार नाही. आणि जर म्हटलंय तर घुसू देणारच नाही. हे योग्य आहे की अयोग्य ते येणारा काळच ठरवेल”, असं बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.

“..त्याबद्दल मी माफी मागतो असं फक्त म्हणा”

“मी कोणते चंद्र-तारे मागितले नाहीयेत. अशक्य असेल अशी कोणतीही मोठी अट ठेवलेली नाही. सगळा खेळ राज ठाकरेंच्या हातात आहे. आम्ही म्हटलं एक पत्रकार परिषद करा. चुकून किंवा जाणूनबुजून ज्या घटना घडल्या, त्याबद्दल मी उत्तर भारतीयांची माफी मागतो असं सांगा. तुम्ही साधूसंतांना सांगा की धर्म, जात, प्रांताच्या आधारावर यापुढे आम्ही कुणामध्ये मतभेद करणार नाही. तुम्हाला मी वचन देतो. यातून उत्तर भारतीयांसोबतच राज ठाकरेंचा देखील सन्मान होईल”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले.

“५ जूनला ते अयोध्येला येऊ शकणार नाही. अयोध्या पूर्ण पॅक आहे. तिथे जागाच नाही. राज ठाकरेंना अयोध्येत माफी मागितल्याशिवाय पाय ठेऊ देणार नाही. त्यांची यात्रा धार्मिक नसून राजकीय यात्रा आहे”, असं बृजभूषण सिंह म्हणाले.

“परराज्यातील नागरीक महाराष्ट्रात दुय्यम…”

“देशातला कोणताही नागरीक महाराष्ट्रात जातो, तेव्हा तो दुय्यम दर्जाचा नागरिक बनून राहातो. तो घाबरून तिथे राहात असतो”, असं देखील बृजभूषण सिंह यांनी यावेळी म्हटलं. “मी महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राच्या लोकांना प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. माझं कुणाशीही वैर नाही. हा लढा सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता परिवर्तनासाठी नाही. अन्यायाविरुद्ध ही लढाई आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan shingh challenge raj thackeray ayodhya visit mns pmw