आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. बहीण-भावाची राजकीय मैदानात एकमेकांवर टीका अधून-मधून पाहायला मिळते. दरम्यान, परळी वैजनाथ येथील सभेत बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. हे आव्हान पंकजा मुंडे स्वीकारतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
परळी वैजनाथ येथील सभेत धनंजय मुंडे म्हणाले की, “मी इथे कोणाचा फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही.” असं म्हणत त्यांनी पंकजा यांना टोला लगावला. मुंडे म्हणाले की, “मी दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या मोठा करतोय. आपल्या मतदारसंघात प्रकल्प येतायत. जलजीवन मिशनवरून सध्या राजकारण सुरू आहे. परंतु त्याचा प्रस्ताव मी मांडला होता. त्याचा आराखडा मी पालकमंत्री असताना तायर केला आहे. यासाठीच्या तांत्रिक मान्यतादेखील मी मंत्री असताना मिळवल्या आहेत.”
हे ही वाचा >> व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला दीड तास मारहाण, मग प्रायव्हेट पार्ट पेटवले, आजारामुळे गेल्याचे सांगत अंत्यविधी उरकले, पण…
धनंजय मुंडे यांचं ओपन चॅलेंज
मुंडे म्हणाले की, “आम्ही आणलेल्या तुमच्या ग्रामपंचायतीतील प्रकल्पांचं भूमीपूजन तुम्ही करा, पण आमच्यावर चुकीची टीका करू नका. मी आपल्या मतदार संघात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC : Maharashtra Industrial Development Corporation) आणलं आहे. आता माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता राज्यात तुमचं सरकार आहे, देशातही तुमचं सरकार आहे, देशातल्या सर्वात मोठ्या सभागृहात तुम्ही आहात, मग आता तुम्ही त्या एमआयडीसीमध्ये एक मोठा प्रकल्प तुमच्या ऐयपतीने आणा. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही म्हणाल ते मी राजकारणात करायला तयार आहे. मी एमआयडीसी आणली आहे, आता तुम्ही उद्योग आणा.”