जिल्हय़ातील प्रलंबित प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा संकल्प नवे पालकमंत्री राम शिंदे यांनी आज, गुरुवारी सर्वपक्षीय नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना जाहीर केला. जिल्हा विभाजनासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा तसेच घाटमाथ्यावरील कोकणात वाहून जाणारे पाणी नगरकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पात जिल्हय़ाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिंदे यांचा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय जलसंधारण समितीचे सदस्य पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजी कर्डिले, जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड, माजी मंत्री बबनराव पाचपुते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योग विकासाला चालना देण्यासाठी विमानतळाची धावपट्टी उभारणे, नगर शहरातील उड्डाणपूल, दौंड-शिर्डी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, जिल्हय़ात ५ नवीन पोलीस ठाणी आदी प्रश्नांसह निळवंडे, कुकडीचा पाणीप्रश्न, माळढोक अभयारण्य यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
पोपटराव पवार यांनी पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हय़ातील आरोग्य, स्वच्छता व जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना केली. खा. गांधी यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन केले. भाजपचे अभय आगरकर, आरपीआयचे सुनील साळवे, शिवसेनेचे शशिकांत गाडे, गुंड, काँग्रेसचे जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे पांडुरंग अभंग, आ. कोल्हे, आ. कर्डिले, आ. कांबळे, आ. मुरकुटे आदींची भाषणे झाली. सत्कार समितीचे निमंत्रक चंद्रशेखर कदम यांनी स्वागत केले. सहनिमंत्रक प्रा. भानुदास बेरड यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा विभाजनावर जुगलबंदी
कार्यक्रमात जिल्हा विभाजनाच्या विषयावर नेत्यांत जुगलबंदी रंगली. या विषयाची सुरुवात करताना जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरलाच मुख्यालय करणे योग्य राहील, असे सुचवले. उत्तरेने दक्षिणेवर कायम अन्याय केला. मुख्यालय संगमनेरला की राहत्याला व्हावे यासाठी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकल्यानेच हा निर्णय राहिल्याचा आरोप कर्डिले यांनी करताना प्रथम विभाजनाचा निर्णय घ्या असा आग्रह धरला. नेत्यांनी दक्षिणेत भांडणे लावली, आता मुख्यालयाचे ठिकाण कोठे करायचे यावरून उत्तरेत त्यांच्यात भांडणे लागली, ही फेड कधीतरी होणारच होती, असा टोला पाचपुते यांनी लगावला. आ. कोल्हे यांनीही विभाजनानंतर कोपरगाव जिल्हय़ाचे ठिकाण करण्याची मागणी केली.
‘सारेच किल्लेदार’
अनेक वक्त्यांनी राम शिंदे यांना केवळ कर्जत-जामखेडचे पालकमंत्री न बनता संपूर्ण जिल्हय़ाचे पालकमंत्री बना, असे आवाहन केले. माजी पालकमंत्री पाचपुते यांनी आपले अनुभव सांगताना या प्रश्नाला हात घातला. जिल्हा मोठा आहे, माणसेही कर्तृत्ववान आहेत, परंतु सर्व किल्लेदार आहेत. कोणी इकडेतिकडे जायचे तरी ठरवून जातात, काय बोलायचे हेही सांगितले जाते. त्यामुळे तुम्ही जिल्हय़ाचे पालकमंत्री व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader