सांगली : Brinjal more expensive than chicken व्रतवैकल्य आणि सणासुदीमुळे अनेक घरांतून श्रावणात मांसाहार हद्दपार झाल्याने बाजारात चिकनपेक्षा वांगी महाग आहेत. तर तुरीचे उत्पादन कमी झाल्याने तूरडाळही द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
सांगली बाजारात मंगळवारी चिकनचा दर १३० रुपये किलो तर सांगलीच्या प्रसिद्ध कृष्णाकाठच्या वांग्याचा दर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे. अनेक कुटुंबांमध्ये श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. यामुळे चिकनचा ग्राहक वर्ग कमी झाला असून ज्या प्रमाणात बाजारात चिकनचा पुरवठा होतो, त्या प्रमाणात उठाव नसल्याने दरात मंदी असल्याचे सांगण्यात येते. तर अंडी दरातही घसरण झाली असून प्रति नग पाच ते साडेपाच रुपये दराने किरकोळ बाजारात अंडी उपलब्ध आहेत. तर चिकनचा दर किलोला १३० रुपये आहे. सोमवारी दर १४० रुपये होता. २४ तासांत दहा रुपये किलोने दर उतरले आहेत. श्रावण संपल्यानंतर गणेशोत्सव असल्याने या कालावधीतही काही कुटुंबांत मांसाहार वर्ज्य असल्याने अनंत चतुर्दशीनंतरच चिकनची मागणी वाढण्याची चिन्हे असल्याचे चिकन विक्रेत्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> Raj Thackeray Sanjay Raut : “राज ठाकरेंबरोबर वेगळं वृत्तपत्र सुरू करणार होतो, पण…”, संजय राऊतांनी सांगितला जुना किस्सा
भाजीपाला बाजारात वांगी १४० ते १६० रुपये किलोने विकली जात असून ठोक दर १०० ते १२० रुपये प्रति दहा किलो असल्याचे भाजीपाला व्यापारी एम.एम. बागवान यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात २० रुपये किलोवर पोहोचलेला टोमॅटोचा दर दहा रुपयांनी वधारला असून ३० रुपये किलो झाला आहे. तर दोडका, प्लॉवर ७० ते ८०, भेंडी ९० ते १००, गवार १०० ते १२०, कारली ५० ते ६० आणि घेवडा ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे.
डाळींचे दरही वधारले दरम्यान, बाजारात डाळींचेही दर वाढले असून चणा डाळीने शंभरी गाठली असून तूरडाळ १८० रुपयांवर किरकोळ बाजारात पोहोचली असल्याचे किराणा व्यापारी महेश फुटाणे यांनी सांगितले. नवीन मूग, चवळी बाजारात येण्यास अजून एक महिन्याचा अवधी आहे. नवीन माल आला तर काही प्रमाणात दर उतरेल. मात्र, फार फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.