शहराचा पाणीपुरवठा उपसा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागल्याने त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीउपशावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहर व उपनगरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
महावितरणच्या एमआयडीसीतील १३२ केव्हीए सबस्टेशनमधील सीटी युनिट जळाल्याने सकाळी १० वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तत्पूर्वीही सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ८.३० ते ९.५५ दरम्यान दोन वेळेला वीजपुरवठा खंडित झाला होता. युनिट जळाल्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पाणी योजनेचा वीजपुरवठा काही मिनिटे जरी खंडित झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीउपशाचे काम सुरळीत होण्यास दोन ते अडीच तास लागतात, याकडे मनपाच्या पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.
पंपिंग स्टेशनमधून दैनंदिन पाणीउपशाचे नियोजन करून शहरासह उपनगरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचा व पुरवठा सुरळीत ठेवण्याचा मनपाचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु वेगवेगळ्या तांत्रिक कारणांनी वीज खंडित होऊन उपसा अनियमित होतो व वितरण टाक्या वेळेत भरता येत नाहीत, परिणामी शहर व उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
महावितरण दर शनिवारी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करतच असते तरीही अनेक वेळा तांत्रिक कारणातून रोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. याशिवाय शहरातील वाढत्या वीजकपातीलाही नगरकर वैतागले आहेत.
याचसंदर्भात केडगाव उपनगरातील नगरसेवक सुनील कोतकर, सुनीता कांबळे, सविता कराळे, माजी नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, गणेश सातपुते, सिराज शेख आदींनी पाणीपुरवठय़ाचे भारनियमन त्वरित बंद करावे या मागणीचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांना दिले आहे.
खंडित वीजपुरवठय़ाने पाणीपुरवठय़ावरही परिणाम
शहराचा पाणीपुरवठा उपसा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागल्याने त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीउपशावर त्याचा परिणाम झाला आहे.
First published on: 31-05-2014 at 03:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broken power supply effect on water supply