|| नितीन बोंबाडे

डहाणू : डहाणू नगर परिषदेकडून इमारत बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलालांची किंमत वाढली असल्याने डहाणू नगर परिषदेला त्यांचा विळखा पडला आहे. डहाणू नगर परिषद क्षेत्रात इमारत परवानगीसाठी प्रति स्क्वेअर फूट १०० रुपये तर भोगवटा प्रमाणपत्रासाठी प्रति चौरस फूट पंचवीस रुपये दर प्रमाणे दलाल दलाली घेत असल्याचे नागरिकांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. तर असा काही प्रकार नसल्याचे सांगून या बाबतीत सखोल चौकशी करण्यात येईल असे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी सांगितले.

डहाणू नगर परिषद क्षेत्रात विकासकांकडून अटी-शर्तींचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. पटेलपाडा, रामवाडी, इंटिग्रेट, मसोली, गोपीपुरा, लोणपाडा भागात चटई क्षेत्राएवजी बिल्टअप क्षेत्राची सर्रास विक्री करण्यात येत आहे. डहाणू नगर परिषदेकडून इमारतीच्या बांधकाम परवानगीत विकासकाला लादून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून सर्रासपणे सदनिकांची विक्री होत असल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.

सन २००८ च्या कायद्यानुसार चटई क्षेत्राची विक्री करण्याचा कायदा करण्यात आला आहे. मात्र, डहाणूत सर्रासपणे बिल्टअप जागेची विक्री केली जात आहे. २००८ मध्ये बिल्टअप        जागेची विक्री करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सदनिकेचा ताबा घेताना सदनिकाधारकाच्या जागेपैकी ४० टक्के जागेची कपात होऊन भ्रमनिरास होत आहे.

डहाणू शहरात पूर्वेला पटेल पाडा, रामवाडी, इंटिग्रेट या भागात चटई क्षेत्राचा चौरस फ़ूट ३,००० ते ४,००० रुपये दर सुरू आहे, तर मसोली भागात ४,५०० ते ५००० दराने विक्री होत आहे. डहाणूत जवळपास १५० इमारती आहेत. डहाणू नगर परिषदेच्या परवानगीमध्ये अट क्र. ४१ व ४२ मध्ये चटईक्षेत्राची विक्री करण्याची अट लादून दिली आहे. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची खंत जगदीश चव्हाण या सदनिकाधारकाने बोलून दाखवली.

डहाणू नगर परिषद हद्दीत गेल्या वर्षभरापासून करोना महासाथीमुळे बंद पडलेले इमारतीचे काम हळूहळू सुरू होत असतानाच इमारत परवानगीसाठी वास्तुविशारद, ठेकेदार तसेच इमारत मालकांना डहाणू नगर परिषदेत हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे. इमारत बांधकामासाठी कायदेशीर नकाशे, झोन वर्गवारी इत्यादी कागदपत्रे सादर करूनदेखील मोठ्या प्रमाणात त्रुटी काढल्या जात असल्याचा आरोप होत आहे. नगर परिषदेतील नगररचना विभागातील अधिकारी दोन दोन वर्षांपासून परवानगी देत नाहीत, असे आरोप काही वास्तुविशारदांनी नगराध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत केले. तर दलालामार्फत प्रस्ताव गेल्यास काम केले जात असल्याचे या वेळी नगरसेवकांनी सांगितले.

डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजपूत यांनी डहाणू शहरातील वास्तुविशारद (आर्किटेक्ट) यांची १५ मार्च (सोमवार) रोजी तातडीची बैठक बोलावून इमारतीच्या परवानगी किंवा कोणत्याही कामासाठी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना लाच देऊ नका, कोणीही पैशाची मागणी केल्यास त्याच्याविरोधात तक्रार करा, असे आवाहन केले.

 

डहाणू नगर परिषदेच्या इमारत परवानगीसाठी दलालामार्फत काम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीच्या बैठकीत परवानगीसाठी लाच न देण्याचे आवाहन केले आहे. – भरत राजपूत,  नगराध्यक्ष, डहाणू नगर परिषद

Story img Loader