पैसा ही अशी गोष्ट आहे जी नातं संपवते. मात्र आईशी असलेलं नातं कधीही संपू शकत नाही हेदेखील तेवढंच खरं आहे. आईच्या मृत्यूनंतर बहिणीने आणि भावाने खरंतर एकत्र यायला हवं होतं आपसात बसून मालमत्ता आणि पैसा यांचा प्रश्न सोडवायला हवा होता. मात्र या दोघांनी वादाचे टोक गाठत आईचा वेगळा दशक्रिया विधी करण्याची हद्द गाठली आहे. मालमत्ता आणि पैसा वाटणीच्या वादातून बहिणीने आणि भावाने मृत आईचा दोनदा दशक्रिया विधी केल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरीतील नाडेकर कुटुंबीयामधला हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
इगतपुरीच्या जयवंता नाडेकर यांचे त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी पटत नव्हते. १२ दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. जयवंता नाडेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात त्यांच्या मुलांचा वाद सुरु झाला. समृद्धी महामार्गामुळे हा प्रकार घडला आहे असंही समोर आलं आहे. समृद्धी महामार्गाच्या भरपाईतून मिळालेले साडेपंधरा लाख रुपये कसे वाटायचे यावरून झालेला बहिण आणि भावामधला वाद म्हणजेच जयवंता नाडेकर यांच्या मुलांमधला वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही आईचा वेगवेगळा दशक्रिया विधी केला. नाडेकर कुटुंबाची १४ गुंठे जमीन आहे ज्या जमिनीला १५ लाख ४४ हजारांचा मोबदला मिळाला होता. या पैशांच्या वाटणीवरून नाडेकर बहिण भावामध्ये वाद सुरु झाला. भावाने म्हणजेच नाडेकर यांच्या मुलाने सगळे पैसे आपल्या बँक खात्यात जमा केले त्याचा वाटा आई वडिलांना दिला नाही आणि आईच्या मृत्यूनंतर बहिणीलाही दिला नाही.
मुलगा आणि सून यांच्यासोबत पटत नसल्याने जयवंता वाडेकर आणि त्यांचे पती मुलीकडे राहात होते. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम आपल्यालाही मिळावी असा दावा मुलीने केला आहे. ज्या १४ गुंठे जमिनीची नुकसान भरपाई मिळाली त्याचा सातबारा मुलाच्या नावावर होता त्याचे पैसे मुलाच्या खात्यात जमा झाले. मात्र याच पैशांवर आता जयवंता यांच्या मुलीने हक्क सांगितला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरु झाला आहे. भावाने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही बहिणीने केला आहे. मुलगीच आपला सांभाळ करते आहे आणि मुलाने पैसे हडपले आहेत असा आरोप वडिलांनी केला आहे.