झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्याच्या पलानी गावात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका युवकाचं नात्याने बहीण असणाऱ्या मुलीशी प्रेमसंबंध सुरू होते. पण ते दोघंही नात्याने बहीण-भाऊ लागत असल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यामुळे दुखावलेल्या जोडप्याने रेल्वेसमोर उडी घेत जीव दिला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर ९६ तास उलटूनही मृतदेह नेण्यासाठी दोघांचेही नातेवाईक आले नाहीत.
‘दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृतदेह कुणाचे आहेत? याची माहिती गावकऱ्यांना आणि मृतांच्या नातेवाईकांनादेखील आहे. मात्र, कुणीही अद्याप मृतदेह घेऊन जायला आलं नाही. कुटुंबाच्या सन्मानाला बाधा पोहोचू नये, म्हणून कुटुंबीय याकडे कानाडोळा करत असल्याचं बोललं जात आहे. मागील चार दिवसांपासून दोघांचे मृतदेह शवगृहात पडून आहेत.
विशेष म्हणजे दोघंही पलानी गावातील रहिवासी असल्याची माहिती बलियापूर पोलीस ठाण्याला आहे. तरीही पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये. दोन्ही मृतदेह अज्ञात असल्याचं म्हटलं जात आहे. मृताचे नातेवाईक स्वत: पोलीस ठाण्यात येऊन जेव्हा एफआयआर दाखल करतील, तेव्हाच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी मूक भूमिका पोलिसांनी घेतल्याचं वृत्त ‘जागरण’ने दिलं आहे.
हेही वाचा- आधी गोड बोलले, जेवू घातलं मग फसवलं; प्रियकराला मारहाण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
मृत बहीण-भावाचा मृतदेह कुटुंबीय स्वीकारत नसल्याने दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तातडीने मृतदेह ताब्यात घ्यावा. अन्यथा नंतर काही उघडकीस आल्यास कुणालाही सोडलं जाणार नाही, असा संदेश पोलिसांकडून गावकऱ्यांना दिला आहे. तरीही कुणी नातेवाईक मृतदेह घेऊन जायला पुढे सरसावलं नाही.