बीड – केज तहसील कार्यालयात घुसून महिला नायब तहसीलदारांवर कौटुंबिक कलहातून हल्ला झाल्याची घटना सोमवारी (६ जून) घडली. त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नायब तहसिलदार आशा वाघ या केज येथील कार्यालयात आपले काम करत असताना सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ (वय ४५, दोनडिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हा कार्यालयात आला. त्याने काही कळायच्या आता बहिण आशावर कोयत्याने मानेवर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर पीडित आशा वाघ त्याच अवस्थेत जीवाच्या आकांताने शेजारील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पळाल्या.
दरम्यान, कार्यालयात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोर मधुकर याला पकडून ठेवल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, पत्नीसह मेव्हण्याच्या कुटुंबाला अटक
हल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्याने टोकाचे पाऊल उचलत थेट कार्यालयात घुसून सख्ख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला.