बी. एस. एन. एल. एम्प्लाइज युनियन महाराष्ट्र परिमंडळाचे सचिव कॉ. पुरुषोत्तम गेडाम यांच्या नेतृत्वाखाली, १६ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आलेला एकदिवसीय लाक्षणिक संप रायगड जिल्ह्य़ासह राज्यात १०० टक्के यशस्वी झाला, अशी माहिती खोपोली दूरसंचार कार्यालयातील कर्मचारी तथा बी. एस. एन. एल. एम्प्लाइज युनियनचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर तायडे यांनी दिली.
गाझियाबाद (उत्तर प्रदेश) बी. एस. एन. एल. युनिटचे जिल्हासचिव कॉ. सुखेंद्रपाल सिंग यांची तीन आठवडय़ांपूर्वी गाझियाबाद कार्यालयाचे महाप्रबंधक आदेशकुमार गुप्ता यांच्या केबिनमध्ये दिवसाढवळ्या सकाळी साडेदहाच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. सचिव कॉ. सुखेंद्रपाल सिंग यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, अशी मागणी संघटनेने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, तसेच बी. एस. एन. एल.च्या दिल्लीस्थित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे, तसेच गाझियाबादच्या पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढून केली होती. तीन आठवडे उलटून गेले, पण अद्याप मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. प्रशासन व पोलीस यंत्रणा मूग गिळून बसली आहे. प्रशासन व पोलीस यंत्रणा बी. एस. एन. एल. कर्मचाऱ्याच्या हत्येसंदर्भात संवेदनशील नसल्याच्या निषेधार्थ हा एकदिवसीय लाक्षणिक संप देशपातळीवर घोषित करण्यात आला होता, असा खुलासा मधुकर तायडे यांनी केला. मारेकऱ्यांना अटक न केल्यास, संघटनेतील वरिष्ठांच्या आदेशानुसार भविष्यात बेमुदत बंद पुकारण्यात येणार असल्याचा निर्वाळा तायडे यांनी शेवटी दिला.