मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी बोचरी टीका केली. ‘प्रत्येक वर्षी तीच तीच आश्वासनं सरकार देत आहे. याआधी छोटी छोटी गाजरं वाटली, पण या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे, जे फसवे आहे’, अशा शब्दात अजित पवारांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली.
मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, आज अर्थसंकल्प सादर झाला आहे. आज हंगामी अर्थसंकल्प मांडला गेला. प्रत्येक वर्षी तीच तीच आश्वासनं सरकार देत आहे. याआधी छोटी छोटी गाजरं वाटली, प या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे, जे फसवे आहे.
सरकारमध्ये बसलेल्या लोकांना काहीच कळत नाही. समोर बैल आणि गाय उभी केली तर या सरकारमधील लोकांना सांगता येणार नाही की बैल कोणता आणि गाय कोणती. दूध कोण देतं हेही या लोकांना कळत नाही. यांना वाटतं दूध हा दूधवाला भैय्या देतो, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
आज अहमदनगर परिसरात दुष्काळ आहे. २ हजार गावे जलयुक्त झाली, अशी माहिती सरकार देत आहे. कोणती गावे त्यांची नावं सांगा, यादी जाहीर करा, सरकारच्या या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६ हजार रु. म्हणजेच महिन्याला केवळ ५०० रु. एवढीच रक्कम मिळणार, असं समजायचं का? या निर्णयानं शेतकऱ्यांचं काय भलं होणार? पिचलेल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेची आणखी किती थट्टा उडवणार? याच रकमेत सत्ताधाऱ्यांनी १ महिना घरं चालवून दाखवावीत, असे आव्हानच पवारांनी दिले.
हे सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. गर्भवती महिलांना २६ आठवडे भरपगारी सुट्टीची तरतूद काही नवीन नाही. यापूर्वी संसदेमार्फत करण्यात आलेल्या कायद्यात संबंधित तरतूद आधीच समाविष्ट होती. यांची सुरक्षेच्या नावानं बोंबाबोंब आहे. महिला सुरक्षेला घेऊन याठिकाणी विशिष्ट तरतूद करायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.
या सरकारने कांद्याचा पार वांदा करून टाकला आहे. चंचोली येथील शेतकऱ्याला कांद्याचं पीक विकल्यानंतर फक्त ५ रुपये मिळाले. सरकार या शेतकऱ्यांच्या जीवावरच सत्तेवर आले, मग त्यांना न्याय का देत नाही?, असा सवाल त्यांनी विचारला. राफेलपेक्षा मोठा घोटाळा पीक विमा योजनेत झाला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा फायदा अंबानी यांच्या विमा कंपन्यांना झाला. हा या सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.