लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली असतानाच त्यात उतरलेल्या २४ म्हशी विजेचा धक्का बसून जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली असता प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा करताना १९ म्हशींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे गुरूवारी सायंकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पीडित भजनावळे कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मागणी केली.

सोलापूर-बार्शी रस्त्यावर गुळवंची गावात राहणारे विष्णू हरिदास भजनावळे यांचा दुग्ध उत्पादन व गोपालनाचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील हरिदास भजनावळे यांनी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गुळवंची शिवारात नेल्या होत्या. तेथेच असलेल्या ओढा प्रवाहीत झाला असताना त्या ओढ्यात विजेची तार अगोदरच तुटून पडली होती. परंतु त्याचा अंदाज भजनावळे यांना आला नव्हता. म्हशी ओढ्याजवळ जाऊन पाण्यात उतरल्या. तेव्हा काही क्षणातच सर्व २४ म्हशी जागीच गतप्राण झाल्या. ही बाब भजनावळे यांना लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून उर्वरीत चार म्हशींना ओढ्यात उतरण्यापासून रोखले. त्यामुळे त्या चार म्हशींचे प्राण वाचले, अशी माहिती स्वतः भाजनावळे यांनी दिली होती. दरम्यान, रात्री महसूल यंत्रणेच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता तेथे १९ म्हशी ओढ्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्या. उर्वरीत म्हशी बचावल्या.

आणखी वाचा-प्रेमसंबंधातून तरूणाचा कट रचून खून; गुन्ह्याची तीन वर्षांनी उकल

महावितरणच्या गलथान कारभारामुळेच विजेची तार तुटून ओढ्यात पडली आणि त्यातून १९ म्हशींना प्राण गमवावे लागल्याबद्दल गावक-यांनी संताप व्यक्त करीत रास्ता रोको केला होता. भजनावळे कुटुबीयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.

दुसरीकडे, या दुर्घटनेबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी विधानसभेत प्रश्न विचारून भजनावळे कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. भजनावळे यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे. त्यांच्याकडे दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचे निदर्शनास आणून देत आमदार माने यांनी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले.