पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक राजेश उर्फ पंडित अग्रवाल याला पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्‍ली येथून मंगळवारी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची याच वर्षी १३ जानेवारी रोजी प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आज अखेर सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये रविंद्र चोरगे, राहुल शिवतारे, सुरेंद्र पाल, सुनिल उर्फ सोनू राठोर, समीर सदावर्ते आणि नितीन दांगट यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी पंडित अग्रवाल याला ताब्यात घेण्यासाठी देशातील अनेक राज्यांत त्याचा शोध घेण्यात येत होता. आज अखेर त्याचा पत्ता लागला आणि पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले. पंडीत दिल्ली येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, त्यांचे खास पथक दिल्लीकडे रवाना झाले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. अग्रवाल याला उद्या (बुधवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builder deven shah murder case pandit agarwal the closet of chhota rajan has been arrested from delhi