पेण अर्बन बँकेच्या बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत विलीनीकरणाला सोसायटीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. १३ अटींच्या अधीन राहून बँक बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत विलीन करण्यास तयार असल्याचे पत्र पेण को-ऑप. बँकेच्या ठेवीदार संघटनेला पाठविण्यात आले आहे. मात्र बुलढाणा अर्बनचा हा प्रस्ताव मान्य करण्यास ठेवीदार संघटनेने विरोध केला आहे
साडेसहाशे कोटींच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या पेण अर्बन को-ऑप. बँकेला जीवदान देण्याची तयारी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने दाखवली आहे. बँकेच्या सर्व शाखा आणि मालमत्तेचे बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत विलीनीकरण करण्यास सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. १३ अटींचे पालन केल्यास पेण बँकेचे विलीनीकरण करण्यास तयार असल्याचे पत्र पेण अर्बन को-ऑप. बँकेच्या ठेवीदार संघटनेला प्राप्त झाले आहे.
यात पेण बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेणे, बँकेच्या सर्व सभासदांना बुलढाणा अर्बनचे नाममात्र सभासद म्हणून स्वीकारणे, बँकेची सर्व मालमत्ता, कर्जदारांची सर्व मालमत्ता बुलढाणा अर्बनच्या नावे करणे, पेण अर्बनच्या वैधानिक देण्यांचा क्रम ठरवणे, पेण अर्बनच्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना प्राधान्याने मात्र रुपये ५० हजारांपर्यंतची रक्कम देणे. ज्या ठिकाणी सध्या बँकेच्या शाखा आहेत, त्या इमारतींच्या मूल्यांकनानुसार ठेवीदारांना रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल. ठेवीदारांना मुद्दल दिल्यानंतर व्याजाच्या संदर्भात विचार केला जाईल, विलीनीकरणानंतर सर्व शाखा पुन्हा सुरू केल्या जातील, त्यानंतर जो नफा होईल त्यातून येणारी रक्कम ठेवीदारांना दिली जाईल. परंतु संस्थेच्या स्वनिधीतून कुठलीही रक्कम ठेवीदारांना दिली जाणार नाही, असा १३ कलमी प्रस्ताव बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने ठेवीदार संघटनेसमोर सादर केला आहे.
मात्र बुलढाणा अर्बनच्या या प्रस्तावाला ठेवीदार संघटनेने विरोध केला आहे. मुळात पेण अर्बन बँकेचे बँकिंग लायसन्स रिझव्र्ह बँकेने रद्द करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे विलीनीकरण होऊ शकणार नाही, दुसरी गोष्ट म्हणजे पेण ही बँक असून तिचे एखाद्या क्रेडिट सोसायटीत विलीनीकरण होऊ शकणार नाही. तसे झाल्यास आजही पेण अर्बनच्या ठेवीदारांना असणारे एक लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकणार नाही. बुलढाणा अर्बनच्या १३ अटींमध्ये ठेवीदारांच्या हिताचा विचार झाल्याचा दिसून येत नसल्याचे ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेनभाई जाधव यांनी म्हटले आहे. बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्याची गोष्ट बुलढाणा अर्बन सोसायटी करते आहे. स्वत:कडील एक रुपयाही टाकण्यास सोसायटी तयार नसल्याचे या प्रस्तावावरून दिसून येत आहे. केवळ बँकेच्या मालमत्ता विकून आलेल्या पैशांवर सोसायटी ठेवीदारांची देणी देणार आहे. ही मालमत्ता कमी अथवा जास्त दराने विकल्यास ठेवीदारांचे मात्र नुकसानच होणार आहे. बुलढाणा अर्बनला खरोखरच पेण अर्बन बँकेचे विलीनीकरण करण्यात स्वारस्य असेल तर त्यांनी ६०० कोटींची रक्कम न्यायालयात अथवा सरकारकडे जमा करावी आणि नंतरच खुशाल विलीनीकरण करावे, असे आवाहन नरेनभाई जाधव यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा