Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात विचित्र अपघात घडला असून यात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २४ जण जखमी आहेत. बुलढाण्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि बोलेरो अशा तीन वाहनांचा अपघात झाला असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स बस) ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. यांचवेळी एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले, त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. अपघातामध्ये खाजगी लक्झरी बस चालकाचा वाहक केबिनमध्येच अडकला होता एक तासाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले.
शेगाव-खामगाव महामार्गावरील जयपूर लांडे फाट्यासमोर सदर अपघात घडला. दोन बस आणि वाहनाची धडक झाल्यानंतर वाहनातील प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितली. स्थानिकांनी यंत्रणांना वेळीच माहिती दिल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार करणे शक्य झाले.