Malkhapur Teacher Rapes Female parent: “तुझ्या मुलाला चांगले गुण देवून प्रथम क्रमांक मिळवून देऊ, यासाठी आम्हाला खुष कर” अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्यांच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकारामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका ३४ वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच त्या शरीरसुखाची मागणी पूर्ण केली नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकीही नराधम शिक्षकांनी दिली होती.
पोलिसांनी काय सांगितले?
मलकापूर पोलीस ठाण्याचे पोरीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले की, पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नुतन विद्यालयात कार्यरत असणाऱ्या आरोपी शिक्षकांविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ६४.२ एम, ७०.१, ३५१.२ आणि ३ (५) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिक्षकांनी विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवून देत, वर्गात पहिला क्रमांक मिळवून देऊ, असे आमिष त्याच्या आईला दाखविले. १९ सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ पर्यंत लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपींना बुलढाणा जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत पाठवले गेले.
याप्रकरणी नूतन महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या शाळेतील दोन शिक्षकांनी केलेल्या कृत्याची वृत्तपत्रातून बातमी वाचल्यानंतर मी व्यवस्थापन समितीला सदर प्रकरणाची सूचना दिली. व्यवस्थापन समितीच्या पुढच्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा करून प्रशासनाला मदत करण्याच्या हेतून योग्य ती कारवाई करण्यात येईल.