बुलढाणा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर िरगणात उतरले आहेत. जिल्हा परिषदेसाठी चौरंगी लढती होणार आहेत.

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण ३४६, तर पंचायत समितीसाठी ६११ उमेदवार िरगणात आहेत. बुलढाणा जिल्हा परिषद आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. शिवसेना व भाजपला भगवा झेंडा फडकावण्यात यश आले नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीपुढे त्यांचे तगडे आव्हान आहे. ग्रामीण भागातील आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपने आता जि.प. व पं.स. निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. जिल्ह्य़ात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, भारिप-बमसं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बसप आदींनी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. बंडाळी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही. दिग्गजांना बाजूला ठेवून नवख्यांना संधी देण्यात आली. काँग्रेसने जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती अंकुशराव वाघ तर, राष्ट्रवादीने महिला व बालकल्याण सभापती आशा झोरे यांना उमेदवारी नाकारली. शेंदुर्जन गटामध्ये शिवसेनेत मोठी घालमेल झाली. राष्ट्रवादीकडून दिनकरराव देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने दामोदर िशगणे यांना समोर करून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून िरगणात उतरवले. किनगाव राजा जि.प. सर्कलमध्ये भाजपने सरस्वती वाघ यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार तोताराम कायंदे यांची सून व माजी जि.प. सदस्य चेपटे यांची कन्या डॉ. शिल्पा कायंदे यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. तोताराम कायंदे हे दोन वेळा अपक्ष आमदार राहिले असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता त्यांच्या घरातूनच भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. ऐन वेळी मोठय़ा प्रमाणात उमेदवारांची अदलाबदली झाली. प्रमुख पक्षांसोबतच भारिप-बमसं व स्वाभिमानीची जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक भूमिका राहणार आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला त्याचा जबर फटका बसू शकतो. सर्वच पक्षातील बंडोबांनी दंड थोपटल्यामुळे पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची कोंडी होत आहे. मोठय़ा  प्रमाणात होणाऱ्या मतविभाजनाचाही फटकाही  पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

प्रचार मोहिमेत स्थानिक मुद्दय़ांपेक्षा केंद्र व राज्यातील विविध राजकीय मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या योजनांचे पाढे वाचणार असून विरोधकांकडून आरोपाच्या फैरी झडणार आहेत. अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोठी कसरत उमेदवारांना करावी लागेल.

या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे आपले गड वाचविण्याचे आव्हान आहे तर, शिवसेना, भाजपला ग्रामीण भागातील आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. छोडे पक्ष व बंडखोरांच्या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्य़ातील राजकारणाला कलाटणी देणारा जिल्हा परिषदेचा निकाल समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दोन माजी अध्यक्ष निवडणूक रिंगणात

जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात अध्यक्ष पतींसह दोन माजी अध्यक्ष उतरले आहेत. माजी अध्यक्ष प्रकाश अवचार यांना िपपळगाव काळे तर वर्षां सुरेश वनारे यांना माटरगाव येथून उमेदवारी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष अलका खंडारे यांचे पती चित्रांगण खंडारे हे अंत्रजमधून निवडणूक लढत आहेत.

समाजमाध्यमांतून प्रचार

  1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक तशी ग्रामीण भागातील. मात्र आता स्मार्ट फोनमुळे तळागाळापर्यंत हायटेक भ्रमणध्वनीचा वापर होतो, त्याचाच फायदा उमेदवार प्रचारासाठी करून घेत आहेत.
  2. उमेदवारांनी समाजमाध्यमांचा वापर प्रचारासाठी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यावर प्रचाराच्या पोस्ट फिरत आहेत. अल्प कालावधीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांना समाजमाध्यमांचा आधार मिळाला आहे.