सांगली : नवखी जागा, नवखी माणसं पाहून भुजलेला बैल उधळला, भिलवडीजवळ कृष्णेच्या पात्रात पडला. मगरीने घेरले. तरीही धाडसी तरुणांच्या बचावपथकाने बैलाला वाचविले. हा थरार औदुंबरच्या डोहात तब्बल चार तास चालला होता.
भिलवडीमधील अक्षय मोरे यांनी माणदेशातील जनावर जातीवंत व चांगले म्हणून सत्तर हजार रुपये मोजून आटपाडीच्या बाजारातून बैल खरेदी केला. या बैलाला खास वाहनातून भिलवडी येथे आणण्यात आले. मात्र, नवखी जागा, नवखी माणसं पाहून वाहनातून खाली उतरत असताना बैलाने कासर्याला हिसडा देऊन नव्या माणसांना झुकांडी देत पळ काढला. त्याला पकडण्यासाठी तरुणही मागे धावत सुटले.
नवख्यापासून वाचण्याच्या नादात बैल कृष्णा नदीत पडला. पाण्यात असलेल्या चार मगरींनी या बैलाला घेरले. यातून वाचविण्याचे प्रयत्न तरुणांचे सुरू होते. मात्र, कधी माणसांना भुजून, तर कधी मगरींच्या तावडीतून वाचण्यासाठी सैरभैर झालेल्या बैलाने पोहत औदुंबरचा डोह गाठला.
हेही वाचा – शिंकायचंय पण शिंकता येईना? ‘हे’ उपाय करुन पाहा; नाक होईल साफ मग, घ्या मोकळा श्वास
अगोदरच आटपाडीसारख्या दुष्काळी भागातून आणलेल्या या बैलाला नदीचे पाणी माहितच नव्हते. यात एका बाजूने चार मगरींनी घेरले, तर दुसर्या बाजूला नवख्या माणसांची आरडाओरड याने तब्बल चार तास भांबावलेल्या बैलाचा थरार सुरू होता. अखेर नावेतून जाऊन काही तरुणांनी नदीच्या तीरावर जाऊन बैलाचा कासरा पकडला. मात्र नदीपात्रातून बाहेर आलेला बैल अधिकच भांबावला होता. त्याला काबूत आणण्यासाठी तब्बल दोन्ही बाजूला चार कासरे लावून नवीन घरी नेण्यात आले.