सांगली : कुणा माथेफिरुने पाठीवरील शेपटीजवळ मारलेली धारदार कुऱ्हाड पाठीत घुसून मांसात रुतल्याने रक्तस्राव करत गावभर फिरणारा वळू. आणि प्राणीमित्रांनी शस्त्रक्रिया करत कुराड काढून वळूची केलेली वेदनामुक्ती. अशा मानवी स्वभावाच्या विरोधाभासातील वेगळे चित्र माधवनगरात मंगळवारी पाहण्यास मिळाले.

हेही वाचा >>> “आमदार आणि इच्छुक उमेदवारांची आमच्याकडे…”, अनिल देशमुखांचा मोठा दावा

सांगलीतील जागृत प्राणी प्रेमींनी माधवनगर परिसरात एका वळुच्या शेपटी जवळ कुऱ्हाड अडकलेली आणि ती तशीच घेऊन वळु फिरत असल्याचे समजले. पाहणी केली असता खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्त झालेल्या परिस्थितीत वळू आढळला. प्राणी बचाव पथक, डब्ल्यूआरसी आणि ॲनिमल राहतच्या सदस्यानी धाव घेत वळूला बेशुध्द करुन पशूवैद्यकीय तज्ञांकडून शस्त्रक्रिया करुन कुऱ्हाड काढली. यासाठी एक तासाहून अधिक काळ द्यावा लागला. कुऱ्हाड काढल्यानंतर मलमपट्टी करण्यात आली‌. यानंतर वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून संजय नगर पोलीस स्टेशमध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.