अलिबाग– वेगवान प्रवासासाठी जगभरातील वाहनचालकांसाठी पसंतीला उतरणारी फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार वाहनचालकाच्या अति उत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतली. तेव्हा मध्ययुगीन कालखंडातील बैलगाडी फेरारीच्या मदतीला धावून आली. वाळूत रुतलेल्या फेरारीला तीने अलगद बाहेर काढत पुढच्या प्रवासासाठी वाट करून दिली. असे जर कोणी सांगीतले तर विश्वास बसणार नाही. पण अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर समोर आली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा, रुपेरी वाळू आणि नारळ फोफळीच्या बागा, याच अप्रुप देशभरातील पर्यटकांना असते, याच निसर्ग प्रेमापोटी लाखो पर्यटक नाताळाच्या सुट्टीत कोकण किनारपट्टीवर दाखल होत असतात. त्यामुळे या कालावधीत समुद्र किनारे पर्यटकांनी अक्षरक्षः फुलून गेलेले असतात. सध्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण पर्यंत हेच चित्र पहायला मिळत आहे. येणारे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर उंट, घोडा, घोडागाडी, बैलगाडी, एटीव्ही अशा विविध सफरींचा आनंद लुटतात. या शिवाय जलक्रिडा प्रकारांचा आस्वाद घेत असतात. मात्र काही पर्यटक अतिउत्साहाच्या भरात स्वताच्या गाड्या घेऊन थेट बीचवर उतरतात. मात्र नंतर या गाड्या कधी वाळूत रुतून बसतात. तर कधी भरतीच्या तडाख्यात सापडतात. अनेकदा अशा घटना घडूनही त्यातून येणारे पर्यटक बोध घेत नाहीत. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर याचीच प्रचिती पर्यटकांना पुन्हा एकदा आली.

हेही वाचा >>>Sadabhau Khot : “देवाच्या काठीला आवाज नाही, तसंच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही”, सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

मुंबईतून दोघे पर्यटक फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया ही कन्हर्टीबल गाडी घेऊन अलिबागला सहलीसाठी आले होते. रेवदांडा समुद्र किनाऱ्यावर सकाळच्या वेळी त्यांनी आपली गाडी वाळूत उतरवली. मात्र काही अंतरावर जाऊन ही गाडी वाळूत रुतली. अनेक प्रयत्न करूनही गाडी निघत नसल्याने, आसपास बघ्यांची गर्दी झाली. त्यांनी गाडीला धक्का मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही.  याच वेळी समुद्र किनाऱ्यावर एक बैलगाडी चालक आपली बैलगाडी हाकत जात होता.

फेरारी चालकांनी बैलगाडीवानाकडे मदतीची याचना केली. स्थानिक भौगोलिक परिस्थितीची अचूक जाण असल्याने त्याने तात्काळ होकार दिला. यानंतर फेरारी गाडीला दोर लावून बैलगाडीला बांधण्यात आले. बैलांनी फेरारीला ओढून वाळूतून अलगद बाहेर काढले. अशा पध्दतीने फेरारीच्या मदतीला बैलगाडी धाऊन आली. हा सर्व प्रकार आसपास उभ्या असलेल्या बघ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. आणि समाज माध्यमांवर टाकला. बघता बघता ही चित्रफीत प्रचंड व्हायरल झाली.