कर्नाटकमधील बंगळुरू येथे मंगळवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. एका ‘टेक फर्म’चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची दिवसाढवळ्या कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास तीन आरोपी हातात तलवार आणि चाकू घेऊन कार्यालयात घुसले. त्यांनी तलवारीने वार करत दोघांची हत्या केली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. फणींद्र सुब्रमण्यम हे ‘एरोनिक्स’ कंपनीचे एमडी होते. तर विनू कुमार हे याच कंपनीचे सीईओ होते. बेंगळुरूमधील अमृतहल्लीजवळ ही दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. शबरिश उर्फ फेलिक्स, विनय रेड्डी आणि संतोष असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. फेलिक्स हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी असून तो एरोनिक्स कंपनीतील माजी कर्मचारी आहे.
हेही वाचा- तोंडाला रुमाल आणि हातात ‘कटर’ घेत दुकानात केला प्रवेश, सिनेस्टाइल दरोड्याचा VIDEO व्हायरल
आरोपी फेलिक्स याने एरोनिक्स कंपनीतून नोकरी सोडल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, आरोपीचा मृत एमडी फणींद्र सुब्रमण्यम यांच्यावर तीव्र राग होता. सुब्रमण्यम यांनी आरोपीच्या उद्योग चालवण्याच्या पद्धतीचा विरोध केला होता. याच रागातून ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. पण या हत्या करण्यापूर्वी फेलिक्सने आपल्या व्हॉट्सअॅपवर हत्येचे संकेत देणारा मजकूर पोस्ट केला होता.
हेही वाचा- बंगळुरू हादरलं! आयटी कंपनीच्या एमडी व सीईओची कार्यालयात घुसून हत्या, तलवारीने केले वार
आरोपी फेलिक्सने हत्येपूर्वी WhatsApp स्टेटसवर ‘आपण फक्त वाईट लोकांना दुखावतो’ असा संदेश दिला होता. त्याने WhatsApp स्टेटसमध्ये म्हटलं, “या ग्रहावरील लोक नेहमीच दुसऱ्याचं कौतुक करतात आणि मग फसवणूक करतात. त्यामुळे मी या ग्रहाच्या लोकांना दुखावतो. मी फक्त वाईट लोकांना दुखावतो. मी कधीही चांगल्या लोकांना दुखावत नाही.” आरोपी फेलिक्स आणि त्याचे दोन सहकारी विनय रेड्डी व संतोष हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.